Makar Sankranti 2023: मकर संक्रांती: ‘या’ ५ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; सूर्यकृपेचा लाभ अन् यश-प्रगती अपार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 11:28 AM2023-01-07T11:28:25+5:302023-01-07T11:34:03+5:30

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला सूर्य आणि शनी एकाच राशीत असणार आहेत. सूर्य गोचर कोणत्या राशींना फलदायी ठरू शकेल? जाणून घ्या...

नवीन वर्ष २०२३ सुरु झाले आहे. नवीन वर्षातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. अवघ्या देशभरात मकर संक्रांती उत्साहात साजरी केली जाते. देशभरातील विविध ठिकाणी मकर संक्रांती साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही मकर संक्रांतीचे महत्त्व विशेष आहे. (makar sankranti 2023)

यंदाच्या वर्षी १५ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला १४ जानेवारी रोजी नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणालाच मकर संक्रांती म्हटले जाते. (surya gochar in makar 2023)

आताच्या घडीला मकर राशीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी विराजमान आहे. त्यामुळे मकर राशीत सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांची युती पाहायला मिळेल. मात्र, सूर्य आणि शनी हे दोन्ही ग्रह शत्रू ग्रह मानले जातात. त्यामुळे या दोन ग्रहांची युती किंवा एकाच राशीत असणे फारसे सकारात्मक मानले जात नाही. (sun transit capricorn 2023)

काही पौराणिक संदर्भानुसार सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र मानले गेले आहेत. मात्र, या दोघांमध्ये शत्रूत्व असल्याच्या कथा प्रचलित आणि प्रसिद्ध आहेत. असे असले तरी सूर्य ग्रहाच्या मकर राशीतील प्रवेशाचा काही राशीच्या व्यक्तींना सर्वोत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशींना सूर्याचे पाठबळ आणि सूर्यकृपा मिळणार, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश लाभदायक ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायात त्यांना विशेष फायदा होईल. उत्पन्न वाढेल. आत्मविश्वास वाढेल. वडिलांसोबतचे नातेही सुधारेल. जोडीदाराच्या सल्ल्याने कोणतेही काम कराल तर तुम्हाला फायदा होईल. धार्मिक कार्यावर श्रद्धा वाढेल. परदेशी कंपनीशी करार करण्याचा विचार करत असाल तर तो पूर्ण होऊ शकतो. धैर्य आणि पराक्रम वाढेल. ऑफिसमधील वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश खूप फायदेशीर ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायिकांना विशेष लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. पैशाच्या बाबतीत एखाद्यावर विश्वास ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. तुमचा विश्वासघात करू शकतो. म्हणूनच सावध राहावे.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश अतिशय शुभ ठरू शकेल. जीवनसाथीचा प्रत्येक बाबतीत पाठिंबा मिळेल. व्यावसायिक बाबतीत खूप शुभ परिणाम घेऊन येणारे ठरू शकेल. चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. जुनी येणी वसूल होऊ शकतात. भागीदारीच्या बाबतीतही लाभ होईल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेशाचा काळ वरदानापेक्षा कमी नसेल. करिअरमध्ये यश मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. फायदा होईल. धर्म आणि अध्यात्म या विषयांमध्ये आवड वाढेल. परिश्रम आणि समर्पणाने केलेल्या कामात यश मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत भावांसोबत सुरू असलेले वाद कमी होऊ शकतील.

मकर राशीत सूर्याचा प्रवेश होत आहे. या राशीत शनी आधीपासून आहे. या राशीच्या व्यक्तींना सूर्याचे संक्रमण फलदायी ठरू शकते. जीवनात सकारात्मकता वाढेल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. फसवणूक होऊ शकते. जोडीदाराकडून उत्तम साथ आणि सहकार्य मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.