Makar Sankranti 2023: यंदाच्या मकरसंक्रांतीला जुळून येत आहे दुर्मिळ योग,दीर्घायुष्यासाठी करा 'हे' विशेष उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:50 AM 2023-01-13T10:50:39+5:30 2023-01-13T10:54:22+5:30
Makar Sankranti 2023:वर्षातील सर्व संक्रांतीत मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव याची राशी बदलते. सूर्याच्या राशी बदलाने मंगळाचे कार्य सुरू होते. यावेळी मकर संक्रांतीला सूर्याचा दुर्मिळ योगायोग होत आहे. सूर्याची राशी बदलण्याचा दिवस सूर्याचा वार अर्थात रविवार आला आहे. त्यामुळे यंदाची सूर्यपूजा सर्वार्थाने विशेष ठरणार आहे. या औचित्याने काय केले पाहिजे ते जाणून घेऊ. सूर्योदयापूर्वी स्नान करा शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. असे मानले जाते की सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने १० हजार गायी दान करण्याइतके पुण्य मिळते. कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक असले तरी प्रयागराज संगमात स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय या दिवशी गंगास्नान केल्यानेही खूप फायदा होतो. जर कोरोनामुळे नद्यांमध्ये आंघोळ करणे शक्य नसेल तर घरच्या आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब मिसळून स्नान करू शकता आणि तेही शक्य नसेल तर अंघोळ करताना पवित्र नद्यांचे स्मरण करा, जेणेकरून साधे पाणीदेखील गंगेसमान पवित्र होईल. मुख्य मुद्दा काय, तर पाणी महत्त्वाचे नाही तर सूर्योदयापूर्वी स्नान महत्त्वाचे आहे. सूर्योदयापूर्वी स्नान का करायचे? कारण हा सूर्यदेवाप्रती कृतज्ञ भाव दर्शविण्याचा प्रकार आहे. जो सूर्य ३६५ दिवस न थकता आपण उठण्याआधी येतो आणि आपल्याला उठवतो, त्या सूर्याच्या सणाच्या दिवशी तरी निदान लवकर उठून, आवरून त्याचे स्वागत केल्यास त्याचा आशीर्वाद नक्कीच मिळू शकेल.
सूर्यदेवाची पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फुले आणि काळे तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे. यादरम्यान ‘ओम घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल. पुराणानुसार सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सुख-समृद्धी तसेच दीर्घायुष्य मिळते.
तीळ आणि गुळाचे दान पद्म पुराणानुसार सूर्याच्या उत्तरायणात केलेले कार्य अक्षय असते. अशा स्थितीत या दिवशी पितरांना अर्घ्य देणे आणि देवतेची पूजा करणे पुण्याचे मानले जाते. याशिवाय या दिवशी काळी चादर, लोकरीचे कपडे, तीळ-गूळ आणि खिचडी दान करणे शुभ आहे. यामुळे शनिदेव आणि भगवान सूर्याचा विशेष आशीर्वाद मिळतो.
सूर्य आणि शनीची कृपा मिळविण्यासाठी हे काम करा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीचा शासक ग्रह शनि आहे, जो सूर्य देवाचा पुत्र आहे. या दोहोंची कृपा व्हावी म्हणून या दिवशी तिळाचे सेवन आणि दान करावे. याशिवाय तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन अवश्य करावे. व शास्त्र सांगते त्याप्रमणे सर्वांशी गोड बोलावे म्हणजे सूर्यदेव आणि शनिदेवासकट सगळ्यांचीच कृपादृष्टी कायम राहते!