२०२४ मार्गशीर्ष सोमवती अमावास्या: राशीनुसार करा अभिषेक; पैशांची चणचण संपेल, सुख-समृद्धी येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:25 IST2024-12-29T10:12:41+5:302024-12-29T10:25:38+5:30

Margashirsha Somvati Amavasya December 2024: मार्गशीर्ष सोमवती अमावास्या ही सन २०२४ मधील शेवटची अमावास्या असून, या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार महादेवांना अभिषेक करणे अतिशय शुभ, पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या...

सन २०२४ची सांगता होत आहे. ३० डिसेंबर २०२४ रोजी सोमवती अमावास्या आहे. सन २०२४ मधील ही शेवटची अमावास्या असून, शेवटचे व्रताचरण आहे. अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे.

सोमवती अमावास्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते.

सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक करणे पुण्यदायी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार शंकराला अभिषेक केल्यास सुख-समृद्धी प्राप्ती होते. तसेच पैशांची अडचण दूर होऊ शकते, मनोकामना पूर्ण होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

मेष: या राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवाला गंगाजलाने अभिषेक करावा. असे केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती मिळते असे मानले जाते.

वृषभ: या राशीच्या लोकांनी गंगाजलात दूध मिसळून महादेवाला अभिषेक करावा. असे मानले जाते की, असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि नात्यात प्रेम वाढते.

मिथुन: या राशीच्या लोकांनी या दिवशी दुधाचा अभिषेक महादेवाला करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद मिळतो.

कर्क: या राशीच्या लोकांनी या दिवशी महादेवाला दह्याचा अभिषेक करावा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

सिंह: या राशीच्या लोकांनी गंगाजलात लाल फूल टाकून महादेवाला अभिषेक करावा. याने इच्छित वर मिळू शकतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढू शकते.

कन्या: या राशीच्या लोकांनी गंगाजलाचा भगवान शिवाला अभिषेक करावा. याने इच्छित वर मिळू शकतो.

तूळ: या राशीच्या लोकांनी महादेवाला पंचामृताने अभिषेक करावा. यामुळे करिअरमध्ये यश मिळते आणि केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळते.

वृश्चिक: या राशीच्या लोकांनी दुधात मध मिसळून महादेवाला अभिषेक करावा. यामुळे व्यवसायात नफा मिळू शकतो.

धनु: या राशीच्या लोकांनी दुधात केशर मिसळून महादेवाला अभिषेक करावा. यामुळे मनातील भीती आणि चिंता दूर होऊन आत्मविश्वास वाढतो.

मकर: या राशीच्या लोकांनी गंगाजलात काळे तीळ मिसळून महादेवाला अभिषेक करावा. यामुळे जीवनात समृद्धी आणि कामात यश मिळते.

कुंभ: या राशीच्या लोकांनी महादेवाला नारळाच्या पाण्याने अभिषेक करावा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात.

मीन: या राशीच्या लोकांनी महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.