पितृपक्षात बुध वक्री: ६५ दिवस ‘या’ राशींना लाभच लाभ, आर्थिक वृद्धी; कुणासाठी संमिश्र काळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:15 PM2022-09-13T15:15:15+5:302022-09-13T15:15:15+5:30

बुधचे वक्री होण्याचा सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात शुभ-प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

आताच्या घडीला पितृपंधरवडा सुरू आहे. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे आशिर्वाद घेण्याचा हा कालावधी मानला जातो. यातच ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह पितृपक्षातच वक्री झाला आहे. बुध स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत विराजमान असून, याच राशीत वक्री झालेला आहे. (mercury retrograde in virgo 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेच्या अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. राशीचा हा बदल काहींसाठी भाग्यवान तर काहींसाठी प्रतिकूल ठरू शकतो. बुध ग्रहाने २१ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. सध्या बुध कन्या राशीत वक्री आहे, ०२ ऑक्टोबर रोजी बुध कन्या राशीत मार्गी होऊन, २६ ऑक्टोबरपर्यंत राहील. बुध वक्री होण्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. (budh vakri in kanya rashi 2022)

बुधाच्या वक्री चलनाने जातकाचे वागणे, बोलणे आणि बुद्धी प्रभावित होते, अशी मान्यता आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. अशा स्थितीत बुधाचे स्वराशीत वक्री होणे अनेक राशींसाठी शुभ ठरू शकते, तर काही लोकांसाठी संमिश्र ठरू शकते. बुध ग्रहाच्या वक्री चलनाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होऊ शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळात सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचे वक्री चलन लाभदायक ठरू शकते. आगामी काळात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकते. वेगवेगळ्या स्रोतातून धनलाभ होऊ शकतो. मात्र, या काळात शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्याच्या नादात चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. प्रेम संबंध सामान्य राहतील. या काळात तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ संमिश्र ठरू शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची आणि तुमचे नाते आणखी घट्ट करण्याची संधी मिळू शकेल. मात्र, या काळात तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये थोडे सावध राहावे लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सर्व सदस्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला कामात काही समस्यांमुळे तणावही येऊ शकतो. संयम बाळगा आणि शांतपणे गोष्टी हाताळणे उपयुक्त ठरू शकेल. शक्य असल्यास गणपती बाप्पाची नियमित पूजा करावी.

कर्क राशीच्या व्यक्तींनी आगामी काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही स्वतःला शांत ठेवावे. तुम्हाला शांत राहून पुन्हा विचार करावा लागेल. व्यावसायिकांनीही सावध राहण्याची गरज आहे. कोणताही करार करण्यापूर्वी कागदपत्रे दोनदा पाहणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होऊ शकतात. शक्य असल्यास बुध ग्रहाशी संबंधित मंत्रांचा १०८ वेळा जप करा.

सिंह राशीच्या व्यक्तींनी बुध वक्री काळात कुणालाही पैसे उसने न देण्याचा सल्ला दिला जात आहे. अवास्तव आणि नाहक खर्चावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. बजेटनुसारच खर्च करा. तुम्ही व्यवसायासंदर्भात नवीन योजना बनवत असाल तर हा काळ फायदेशीर ठरू शकेल. या कालावधीत केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात लाभ देईल. नोकरदारांनी संभाषणात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींनी आगामी काळात हितशत्रुंपासून सावध राहण्याची गरज आहे. ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यात होत असलेल्या बदलांचा विचार करायला हवा. तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय सध्या न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्य असल्यास बालगोपालांची नित्य पूजा करावी.

तूळ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ यशकारक ठरू शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे तुम्ही कठोर परिश्रमाने पूर्ण करू शकाल. आपल्या विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका. अनेक अनावश्यक खर्च तुमच्या समोर येऊ शकतात. बजेट आखूनच त्यानुसार खर्च करावेत. आगामी काळात वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचे वक्री चलन संमिश्र ठरू शकेल. या काळात कुठेतरी अडकलेले तुमचे पैसे परत मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने चांगला काळ आहे. तुम्ही तुमच्या करिअरमधील अपूर्ण कामे किंवा प्रकल्प पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. तुमचे अनेक नवीन लोक मित्र बनतील. कोणत्याही चुकीच्या संगतीत पडणार नाही याची काळजी घ्या.

धनु राशीच्या व्यक्तींना आगामी कालावधी संमिश्र ठरू शकेल. भागीदारीत काम करणाऱ्यांचे भागीदाराशी चांगले संबंध राहतील. कौटुंबिक जीवनात अडचणी दूर होऊ शकतील. प्रत्येक निर्णय यशस्वी ठरू शकेल. तुम्ही नकारात्मक विचारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधचे वक्री चलन अनुकूल ठरू शकते. विद्यार्थी वर्गासाठी काळ चांगला राहील. या काळात परीक्षांमध्ये सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. करिअरच्या दृष्टीने सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी चांगला परिणाम देईल. तुमची बढती आणि बदली इच्छेनुसार होऊ शकते. गेल्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला मालमत्तेचा व्यवहार आगामी काळात पूर्णत्वास जाऊ शकतो.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ संमिश्र ठरू शकेल. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला शारीरिक थकवा अधिक जाणवू शकतो. तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या काळात केलेले व्यवहार त्रासदायक ठरू शकतात. प्रेम संबंधांमध्ये संयम आणि शांततेने गोष्टी हाताळणे हिताचे ठरू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधचे वक्री चलन संमिश्र ठरू शकेल. या काळात दाम्पत्य जीवन तणावपूर्ण असू शकेल. नात्यातही गैरसमज वाढू शकतात. मनात कोणतीही गोष्ट न ठेवता जोडीदाराशी शेअर करणे हिताचे ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रतिकूल ठरू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असू शकते. काही समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. - सदर माहिती ही सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, बुध वक्री चलनाच्या प्रभावासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.