Mercury In Aquarius 2022: बुधचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे उत्तम योग; प्रगतीसह भाग्योदयाचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:32 AM2022-03-03T09:32:28+5:302022-03-03T09:37:19+5:30

Mercury In Aquarius 2022: बुधचे कुंभ राशीतील गोचर कोणत्या ५ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या...

फेब्रुवारीसह मार्च महिनाही ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात चार ग्रह राशीबदल करणार आहेत. याची सुरुवात बुध ग्रहापासून होत असून, ०६ मार्च रोजी बुध मकर राशीतून शनीचेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (mercury transit aquarius 2022)

बुध ग्रहानंतर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. तर २४ मार्चला बुध मीन राशीत प्रवेश करेल, तर महिन्याच्या शेवटी म्हणजेत ३१ मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. २४ फेब्रुवारीपासून अस्ताला गेलेला गुरू २६ मार्चला मार्गक्रमण करेल. (budh in kumbha rashi 2022)

बुध हा बुद्धी, संवाद, तार्किक क्षमता आणि धनाचा कारक मानला जातो. बुधच्या कुंभ प्रवेशाचा प्रभाव सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात पडणार आहे. मात्र, अशा ५ राशी आहेत, ज्या राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी उत्तम ठरू शकेल.

कुंभ ग्रह ०६ मार्च ते २४ मार्च या कालावधीपर्यंत कुंभ राशीत विराजमान असेल. यानंतर बुध हा गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करेल. या कालावधीत बुधसह कुंभ राशीत गुरु आणि सूर्य हे ग्रह असतील. यामुळे काही कालावधीसाठी बुधादित्य नावाचा अद्भूत योग जुळून येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

बुध ग्रहाच्या कुंभ राशीतील गोचराचा कोणत्या ५ राशीच्या व्यक्तींना लाभ होईल. यश, प्रगतीचे मार्ग साध्य करता येईल, आर्थिक आघाडीवर फायदा होऊ शकेल, ते जाणून घेऊया...

बुधचा कुंभ प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी यशकारक ठरू शकतो. सेल्स, मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. नवीन व्यवसाय, उद्योगाची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला कालावधी ठरू शकेल. प्रवासाचे योग लाभदायक ठरू शकतील.

बुधचा कुंभ प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकतो. या कालावधीत नशीबाची उत्तम साथ लाभू शकेल. धार्मिक कार्याची आवड वाढीस लागू शकते. मानसिक शांततेचा अनुभव घेऊ शकाल. जुनी गुंतवणूक चांगला लाभ मिळवून देऊ शकेल. ज्येष्ठांचा सल्ला सकारात्मक ठरू शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल.

बुधचा कुंभ प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीकारक ठरू शकतो. विद्यार्थ्यांना यशाचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी होऊ शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी लाभदायक कालावधी ठरू शकेल. मनातील भावना उत्तम प्रकारे व्यक्त करू शकाल.

बुधचा कुंभ प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सुखकारक ठरू शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकेल. शुभवार्ता प्राप्त होऊ शकतील. वाहन, जमीन, घर खरेदीची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकेल. समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळू शकेल. नोकरदार वर्गाला उत्तम कालावधी असून, पदोन्नतीचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

बुधचा कुंभ प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकेल. मीडिया, फिल्म इंडस्ट्री या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचे कौतुक होऊ शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभेल. नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतील. चिंतामुक्तीचा अनुभव घेऊ शकाल. विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने अभ्यास करणे उपयुक्त ठरू शकेल.