२०२५ जानेवारीत बुधाचे २ वेळा गोचर: ७ राशींना राजयोग, नवीन नोकरीची संधी; व्यापारात नफा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:13 IST2025-01-03T09:04:58+5:302025-01-03T09:13:02+5:30

बुधाच्या राशी गोचराने राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना याचा चांगला लाभ, सकारात्मक शुभ परिणाम मिळू शकतात, ते जाणून घ्या...

जानेवारी २०२५ मध्ये अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. ०४ जानेवारीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करेल. या राशीत नवग्रहांचा राजा सूर्य विराजमान असून, या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. त्यानंतर १४ जानेवारी रोजी सूर्य ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. त्या दिवशी मकर संक्राती सण साजरा केला जाईल. २१ जानेवारी रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह वक्री चलनाने मिथुन राशीत प्रवेश करेल.

यानंतर २४ जानेवारी रोजी बुध ग्रह पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करून मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीतही सूर्य आणि बुध ग्रहांचा बुधादित्य राजयोग पुन्हा जुळून येईल. २८ जानेवारी रोजी शुक्र उच्च मानल्या गेलेल्या मीन राशीत प्रवेश करेल.

तत्पूर्वी ०४ जानेवारी २०२५ रोजी बुध ग्रह गुरु ग्रहाचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत आणि कालांतराने मकर प्रवेश करेल. बुधाचा धनु आणि मकर राशीतील प्रवेश आणि बुधादित्य राजयोगाचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: नशिबाची साथ लाभू शकेल. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच या काळात चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. धार्मिक कार्यात अधिक रस असेल. देश-विदेशात पर्यटनाची संधी मिळू शकेल.

मिथुन: वडिलांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण होऊ शकतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. इतरांना मदत करण्यासही तयार असाल. मुलांच्या यशाबद्दल अभिमान वाटेल. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.

सिंह: ट्रेडिंग किंवा शेअर बाजाराशी संबंधित काम करत असाल तर नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी असमाधानी आहेत, त्यांना नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून समाधानी व्हाल. पुरेसे पैसे कमवू शकाल.

कन्या: बुधाचे गोचर फायदेशीर ठरू शकेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. सुख-सुविधा वाढतील. दुसऱ्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे नफा मिळणार नाही, त्यामुळे थोडी निराशा होऊ शकते.

तूळ: पद आणि प्रतिष्ठा वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे बॉस आणि सहकारी कौतुक करतील. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळेल. उत्तम संवादशैलीच्या मदतीने विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाला अचानक गती मिळेल. फायदा होऊ शकेल.

मकर: आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होतील. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच विचारपूर्वक आखलेल्या योजना यशस्वी होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते.

कुंभ: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतील. व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. पैसा अडकला असेल तर या काळात मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना शुभ परिणाम मिळू शकतील. कारकीर्द सुरू करण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. दोघांमधील चांगल्या समन्वयामुळे एकमेकांशी मोकळेपणाने बोलाल. नाते आणखी घट्ट होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.