Nag Panchami 2024: नागपंचमीला 'या' वस्तूंचा वापर करू नका; अकारण निर्माण होईल सर्पदोष! By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:15 AM 2024-08-09T10:15:01+5:30 2024-08-09T10:17:49+5:30
Nag Panchami 2024: चातुर्मासातला आणि श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी! श्रावण वद्य पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. यावेळी पंचमी तिथी ९ ऑगस्ट रोजी आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याबरोबरच उपवासही केला जातो. तसेच नागपूजेला जोड म्हणून काही नियमांचे पालन करा असे सांगितले जाते. अन्यथा कुंडलीत सर्प दोष निर्माण होऊ शकतो. तो टाळण्यासाठी आजच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते जाणून घेऊ. नागपंचमीला मातीच्या नागमूर्तीची पूजा केली जाते आणि उपवासही केला जातो. नागदेवतेची पूजा केल्याने सर्व संकट दूर होते असे मानले जाते. केवळ नागाची नाही तर त्याच्या पिलांची, पूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते. त्यामुळे कुटुंबाचे रक्षण होते, अकाली मृत्यूचे भय टळते. म्हणून काही ठिकाणी रांगोळीने नाग काढून त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. अशा पूजेबरोबर अनिवार्य आहे ते म्हणजे काही नियमांचे पालन! या दिवशी कापणे, भाजणे, चिरणे या गोष्टी करू नये हे आपण जाणतोच, शिवाय पुढील गोष्टींचा वापर न करणे इष्ट ठरते.
नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांडी वापरू नका. असे मानले जाते की नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांडी जसे की तवा, कढई इत्यादींवर अन्न शिजवू नये. असे मानले जाते की लोखंड हा नागाचा प्रिय धातू आहे. ते लोखंडी वस्तूंमध्ये राहतात. म्हणून या दिवशी तव्यावर रोटी बनवू नये किंवा लोखंडी भांड्यात अन्न शिजवू नये. तसेच लोखंडाचा संबंध शनिशी आहे, त्यामुळे आजच्या दिवशी लोखंडाचा वापर केल्याने तुमच्या कुंडलीत सर्पदोष आणि शनिदोष निर्माण होऊ शकतो.
या दिवशी तीक्ष्ण वस्तू वापरू नका नागपंचमीच्या दिवशी सूरी, कात्री इत्यादी धारदार वस्तूंचा वापर करू नये. तसेच विणकाम, भरतकामदेखील करू नये. ग्रामीण भागात आजही साप घरात आश्रयाला येतात. चुकून त्यांच्यावर प्रहार होऊ नये म्हणून त्यांच्या जीवदानासाठी आजच्या दिवशी या वस्तूंचा वापर टाळा असे सांगितले आहे. इतर वेळी देखील साप आढळल्यास त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलावून त्यांना सुरक्षित स्थळी सोडून या असा संदेश यातून मिळतो. या गोष्टीची जाणीव शहरी भागातही व्हावी म्हणून आजच्या दिवशी तीक्ष्ण वस्तूंचा वापर टाळावा असे शास्त्र सांगते.
नागपंचमीच्या दिवशी खोदकाम करू नका नागपंचमीच्या दिवशी खोदकाम, बागकाम करू नये. अशा ठिकाणी साप पिलांना जन्म देतात. त्यांची अंडी असतात. त्यांना निर्वंश करण्याचे पातक लागू नये म्हणून जाणीवपूर्वक आजच्या दिवशी ही कामे टाळावीत आणि अन्य वेळी देखील दक्षता घ्यावी. जर आपण दुसऱ्यांचा सांभाळ केला तर निसर्ग आपलाही सांभाळ करतो, हे नक्की!
पूजेचे साहित्य फेकून देऊ नका या दिवशी पूजेत वापरल्या जाणाऱ्या कापसाच्या विड्या, अगरबत्ती, अगरबत्ती, पूजेत वापरण्यात येणारी फुले इत्यादी वस्तू या दिवशी घराबाहेर टाकू नका. वास्तविक या द्रव्यामध्ये सर्पदेवता वास करते असे मानले जाते. सर्पदंश होण्याची भीती असते. म्हणून पावसाळ्यात सांभाळून या गोष्टींचा वापर करावा.