Navratri 2021 : नवरात्रीच्या उपासात 'ही' १० पथ्य पाळलीत, तर निश्चित फळ मिळेल याची खात्री बाळगा! By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:10 PM 2021-10-06T13:10:37+5:30 2021-10-06T13:36:18+5:30
Navratri 2021 : नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस किंवा दहा दिवस उपास करतात. उपास हा फक्त आहाराच्या बाबतीत असून चालत नाही, तर उपासाला जोड लागते ती उपासनेची. म्हणून केवळ जेवणाबाबत पथ्य पाळून उपयोग नाही, त्याबरोबर कायिक, वाचिक आणि मानसिक उपासही करायला हवा, तरच खरी उपासना घडू शकेल. काय आहेत या उपासाची पथ्ये, चला जाणून घेऊया. उपासाने जशी शरीर शुद्धी होते, तशी कायिक, वाचिक, मानसिक उपासाने तना-मनाची शुद्धी होते. येत्या नऊ दिवसांत आपण जगदंबेची उपासना करणार आहोत. त्यालाच पुढे दिलेल्या पथ्यांची जोड दिली तर उपासाला आणि उपासनेला नक्कीच पूर्णत्व येईल.
न खाऊन आपण राहू शकतो, तसे न रागावता राहण्याचा प्रयत्न करावा. अर्थात रागाचा उपास करावा. हा उपास शक्य तेवढा कडक करावा. केवळ वरवरचा राग नाही, तर मनातूनही कोणाबद्दल द्वेष, मत्सर, असूया वाटणार नाही, याची काळजी घ्यावी. तरच मनात सात्विक विचारांचा नंदादीप अखंड तेवत राहील.
या नऊ दिवसांत शरीर संग टाळावा. मनावर, शरीरावर, वासनेवर नियंत्रण मिळवता येणे, एवढाच त्यामागील हेतू आहे. विषयात अडकलेले मन ध्येयावर केंद्रित होत नाही. परमार्थात लागत नाही.
वाईट बघू नका, बोलू नका, ऐकू नका असे आपल्याला शिकवले जाते. या दिवसात वाईट गोष्टींऐवजी चांगलेच बोला, चांगलेच ऐका, चांगलेच ऐका, ज्यामुळे परिणाम चांगलेच मिळतील.
नवरात्र पाठोपाठ दसरा-दिवाळी या निमित्ताने आपण घरात आवराआवर करतो, तशी मनाची आवरा आवर करा. मनातली जळमटं कायमची काढून टाका. अडगळीत पडलेल्या आठवणी टाकून द्या. मनात भरपूर जागा होईल, ती जागा चांगल्या विचारांनी भरून काढा.
या नऊ दिवसांमध्येच तर नाहीच, पण आयुष्यभर कोणाही स्त्रीचा अपमान करणार नाही, अशी शपथ घ्या. नारीचा सन्मान करा, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे, तिचे पालन करा. आई बहिणीवरून शिवीगाळ करणार नाही असा पण करून टाका.
ज्यांना पूर्णवेळ उपाशी राहता येणार नाही, त्यांनी फलाहार करावा किंवा एकवेळ जेवावे. परंतु उपासाचे पदार्थ खाऊन उपास करू नये. उपास ही एकप्रकारे तपश्चर्या आहे. त्यासाठी मनोनिग्रह हवा. उपासाचे पदार्थ खाण्याऐवजी रोजचे जेवण जेऊन केलेला उपास चालू शकेल.
नऊ दिवस फलाहार करणे जमले नाही तर किमान शाकाहार जरूर पाळावा. अर्थातच मांसाहार तसेच कांदा लसूण वर्ज्य करावा. मद्यपान तर दूरच! हे पदार्थ तामसी भाव जागृत करणारे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे रागाचा उपास धरायचा असेल तर या पदार्थांचा उपास करावा लागेल व विकारांवर नियंत्रण मिळवावे लागेल.
आपण जसे अन्न ग्रहण करतो, तशी आपली वृत्ती बनते. म्हणून पूर्वीचे लोक फक्त घरचे अन्न ग्रहण करत असत. आपण निदान नऊ दिवस परान्न अर्थात बाहेरचे जेवण टाळण्याचा संकल्प करावा.
या सर्व पथ्याचा उपयोग काय? असे विचाराल, तर उत्तर एकच आहे...समाधान! तेच समाधान, जे मिळवण्यासाठी आपण दिवस रात्र धडपडतो. कुठे थांबावं हे कळलं की मनाचा वेग नियंत्रणात येतो आणि मन नियंत्रणात आले की उपास आणि उपासना नक्कीच फलदायी ठरते.