Navratri 2022: नवरात्रीला वास्तुशास्त्रानुसार करा पूजेची तयारी, आई भगवती येईल तुमच्या घरी! By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:28 PM 2022-09-19T17:28:53+5:30 2022-09-19T17:37:24+5:30
Vastu Shastra: सोमवार २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत असून ५ ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. नवरात्रीमध्ये आई भगवतीच्या ९ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते तसेच अनेक नियमांचे पालन केले जाते. यावेळी जसा आपण देवाचा गाभारा स्वच्छ करतो, तेवढीच आपली वास्तूदेखील पवित्र ठेवणे आवश्यक असते. नवरात्रीच्या वेळी घटस्थापना केली जाते. घटाच्या बाजूला पसरलेल्या मातीत धान्याची रुजवण केली जाते. ते धान्य जसजसे फोफावते तसतसे घरात चैतन्य, मांगल्य पसरते. या बरोबरच घरात सुख-समृद्धीही वृद्धिंगत होते. अशा सकारात्मक ऊर्जेसाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे महत्त्वाचे ठरते. ती दूर केली तरच सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या वास्तूत होऊ शकेल. यासाठी वास्तू शास्त्राने दिलेले उपाय जाणून घेऊ.
नवरात्रीचे दहा दिवस आपल्या वास्तूच्या मुख्य दारावर कुंकवाने स्वस्तिक रेखाटा. तसेच आम्रपल्लव आणि झेंडूचे तोरण लावा. ते शक्य नसेल तर आंब्याची डहाळी लावा. प्रवेश द्वारावरील या खुणा तुमच्या वास्तू मध्ये आनंद, चैतन्य आणि मांगल्य आणतील.
शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करणार असाल तर तो घराच्या ईशान्य दिशेला करा. घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करून त्यावर गोमूत्र शिंपडून घ्या. फुलांची आरास करून, पत्रावळीवर माती पसरून त्यावर घट स्थापन करा. ईशान्य कोपरा हा देवीदेवतांना आकर्षून घेतो.
नवरात्रीत तुम्ही नऊ दिवस तेलाचा दिवा अखंड तेवत ठेवणार असाल तर तो वास्तूच्या आग्नेय दिशेला ठेवा. कारण आग्नेय दिशा ही अग्नी तत्त्वाशी संबंधित आहे. त्या अखंड दिव्यामुळे तुमचे घर उजळून निघेलच शिवाय तुमचे भाग्यही उजळेल.
नवरात्रीचे नऊ दिवस देवीला चंदनी टिळा लावा. देवी प्रसन्न होईल. रोज सहाणेवर चंदन उगाळून त्याचा टिळा देवीला लावा आणि तोच टिळा स्वतःलाही लावा. चंदन शीतल असते. त्याच्या नित्य वापराने आणि सुगंधाने डोकं शांत राहते आणि विचारशक्तीला चालना मिळते.
नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेलाचा लावलात तरी रोज सायंकाळी तुपाच्या निरांजनाने देवीची आरती करा. आरती करताना करताल, टाळा, शंख, घंटा यांचाही वापर करा. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक लहरी तुमची वास्तू व्यापून टाकतील.
देवीच्या पूजेत लाल फुलं, लाल वस्त्र यांचा अधिकाधिक वापर करा. नवरात्रीत एक दिवस कुंकुमार्चन जरूर करा.
नवरात्रीचा सण नवरंगाचा महोत्सव करणारा आहे. या दिवसात काळा रंग वगळून अन्य सर्व रंगाचा मनमुराद आनंद लुटा आणि हे रंग आपल्याही आयुष्यात उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.