Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल! By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:44 PM 2024-09-24T12:44:01+5:30 2024-09-24T13:04:51+5:30
Navratri 2024: हिंदू घरात देव्हारा असतोच आणि नित्य देवपूजाही ठरलेली असते. काही जण घाईघाईत तर काही जण तास दोन तास देवपूजेत घालवतात. यात चूक बरोबर असे काही नाही. संत ज्ञानेश्वर म्हणतात तसं, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेला! अर्थात मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धरून नेते. मग आपापल्या सवडीने कोणी कितीही वेळ द्यावा. त्यातील शुद्ध भाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावे. त्याबरोबरच देवपूजेत काही कळत नकळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे! ३ ऑक्टोबर रोजी नवरात्र (Navratri 2024) सुरु होत आहे, त्यामुळे घटस्थापने(Ghatasthapana 2024)आधी दिलेले बदल अवश्य करा. देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो. धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो. मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते. अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते. घरात सुख समृद्धी नांदते. त्यासाठी १० महत्त्वाचे नियम जाणून घेऊ.
देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा. जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा. याव्यतिरिक्त देव्हाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा.
देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे. देवघर शक्यतो जमिनीवर असावे. जागेअभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे. अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते.
देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे. अक्षता अखंड असाव्यात अर्थात, तांदुळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये. तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध, कुंकू लावून मगच पूजेस बसावे.
देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे. पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे. पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून, देव पुसून मग देव्हाऱ्यात ठेवावेत.
पूजेची भांडी तांबे, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची, स्टीलची, अल्युमिनियमची वापरू नयेत. शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते. तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते.
देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा. त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी वात बदलून घ्या. तेल, तूप शुद्ध प्रतीचे वापरा. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका. देव्हाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका.
सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या, पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या. म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील.
देवघरात एकाचे देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा, मूर्ती ठेवू नका. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा. देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती, दत्तगुरु. याव्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती, तसबिरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा.
देवघरातील मूर्ती किंवा तसबीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी. ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील, त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे.
देवाला जी फुलं वाहतो, ती अंगठा, मध्यमा, अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच वाहावीत. निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत. ताजी फुलं वाहावीत. ताज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. बाकी काही शक्य नसेल तर गूळ खोबरं, गूळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो.
देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदुळाची आरास करून त्यात ठेवावी. धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे. देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते. म्हणून देवीचे आसन धन, धान्याने परिपूर्ण असावे.
देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सकारात्मकता निर्माण होते.
देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे, मंत्रोच्चार करावा, १०८ मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी. या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही, थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध-सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते.