नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:00 AM2024-09-30T11:00:26+5:302024-09-30T11:12:35+5:30

Navratri 2024: नवरात्रोत्सवाची सुरुवात काही राशींसाठी शुभ पुण्य लाभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

Navratri 2024: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नवरात्रोत्सव सुरू होत आहे. वर्षभरात तसेच चातुर्मासात जे जे सण-उत्सव साजरे केले जातात. त्यात नवरात्राचे महात्म्य आणि महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. संपूर्ण देशभरात हा उत्सव अगदी दणक्यात साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची सेवा केली जाते. देवीची कृपा लाभावी म्हणून आपापल्यापरिने अनेकविध कार्ये केली जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला चांगले योग जुळून येत आहेत. यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा आहे, असे सांगितले जात आहे. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापना होणार असून, १२ ऑक्टोबर रोजी दसरा आहे.

नवरात्राची सुरुवात अनेक राशींसाठी अतिशय चांगली मानली जात आहे. कुटुंब, व्यवसाय, नोकरी, व्यापार, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल? नवदुर्गा देवीची अपार कृपा आणि अचानक धनलाभ योग कोणत्या राशींना लाभेल? जाणून घेऊया...

मेष: मनात नावीन्यपूर्ण कल्पना येतील. मात्र, एखादे काम रखडले जाईल. त्यामुळे थोडा हिरमोड होऊ शकतो. वादविवादात पडू नका. प्रसंगी माघार घेतली तरी हरकत नाही. योजना गुप्त ठेवा. शुक्राशी चंद्राची होणारी युती अनुकूल फळे देईल. प्रेम प्रकरणे फलद्रूप होतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. विवाहेच्छुकांना शुभ व फलदायी काळ आहे.

वृषभ: नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे जबाबदारी वाढेल. कामाचा ताण राहील. थोडे नियोजनपूर्वक कामे केली, तर परिस्थिती आटोक्यात येईल, कन्या राशीत बुध, केतू, चंद्र युतीमुळे काही अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वासाने कामे करत राहिल्यास यशस्वीपणे मार्ग काढाल. विरोधात कारवाया करणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका.

मिथुन: अंदाज चुकू शकतात. जाणकारांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. काहींना जवळचा प्रवास घडून येईल. चार ग्रहांच्या युतीमुळे घरगुती वाद विकोपाला जाणार नाहीत, याची काळजी घ्या. शेजाऱ्यांशी वाद टाळा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल.

कर्क: आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारी अनेक कामे हातावेगळी कराल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेची कामे होतील. व्यवसायात सतत कार्यरत राहाल. व्यावसायिक अंदाज चुकू शकतात. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. एखादे काम झाले नाही, तर त्यासाठी इतरांना दोष देऊ नका. नाहीतर विनाकारण लोक दूर जातील. नोकरीत सोयी-सुविधा आर्थिक लाभ, असे फायदे होतील. नवीन नोकरी मिळेल.

सिंह: चंद शुक्र युतीचा शुभ परिणाम दिसून येईल. मनात उत्साह राहील. कल्पक विचार राहतील. व्यवसायात भरभराट होईल. थोडे सावधपणे व्यवहार करा. आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. गोपनीय माहिती इतरांना देऊ नका. कुठल्याही धोकादायक लिंक्सला क्लिक करण्याचा मोह टाळा. ओटीपी, पासवर्ड चुकीच्या लोकांना सांगू नका.

कन्या: आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. मनात आध्यात्मिक विचार राहतील. महत्त्वाच्या कामांशी संबंधित माहिती शोधा. कामाची पूर्वतयारी करून ठेवा. शुभ फळे मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. एखादी चांगली बातमी कळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल.

तूळ: प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. काही अनपेक्षित फायदे होतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू मिळतील. समाजात तुमचा गौरव होईल. कन्या राशीतील चंद्र, केतू व बुध यांच्या युतीमुळे काही अडथळे येऊ शकतात. बेपर्वाईने वागू नका. लोकांना नाराज करू नका. कायद्याची बंधने पाळा. निष्कारण खर्च टाळा. कालांतराने अनेक अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील.

वृश्चिक: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. बरेच काम करावे लागेल. त्याचा भविष्यात फायदा होणार असल्याने कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. मित्र परिवार अडचणीत आणू शकतो. भावनेच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. देण्या-घेण्याचे व्यवहार सावधपणे करा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

धनु: एखादी आनंदाची बातमी मिळेल. उत्साह वाढेल. काहींना पर्यटनाच्या दृष्टीने फिरणे होईल. कन्या राशीतील सूर्य, बुध, केतू व चंद्र युतीमुळे कार्यक्षेत्रात आव्हाने उभी राहतील. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घेणे श्रेयस्कर ठरेल. उत्तरार्ध संस्मरणीय राहील. चंद्र, शुक्र युती अकल्पनीय लाभ देतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात भरभराट होईल.

मकर: इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने चांगला राहील. सुरुवातीला काही अडचणी असतील, लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. घाईघाईत कामे करू नका. एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ शकतात. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील. चंद्र, शुक्र युतीचे अनुकूल परिणाम दिसून येतील. नोकरीत बढती, बदली, पगारवाढ मिळेल.

कुंभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. बेपर्वाईने वागून चालणार नाही. जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पूर्ण होतील याकडे लक्ष द्या. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सतत व्यस्त राहावे लागेल. चार ग्रहांच्या युतीमुळे काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. कायद्याची बंधने पाळा. उत्तरार्धात अडचणी दूर होतील.

मीन: थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. मनात अकारण काळजीचे विचार राहतील. प्रयत्नपूर्वक सकारात्मक पद्धतीने विचार करा. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. आर्थिक व्यवहारांची माहिती इतरांना सांगू नका. व्यवसायात वादापासून दूर राहा. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.