नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:54 AM2024-10-03T11:54:14+5:302024-10-03T12:05:31+5:30

Navratri 2024: नवरात्रोत्सवात राशीनुसार नवदुर्गा देवीचे पूजन करून नैवेद्य अर्पण करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या...

Navratri 2024: ०३ ऑक्टोबर २०२४ पासून ते १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. घटस्थापना करून नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. चातुर्मासातील नवरात्रोत्सव अनेकार्थाने विशेष महत्त्वाचा मानला जातो.

नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. या उत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्य साधारण असून, नवरात्राचा काळ भगवती देवीच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

या नवरात्रात तुमच्या राशीप्रमाणे नवदुर्गा देवींचे पूजन करणे. तसेच विशेष नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ लाभदायक मानले जाते. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी नवरात्रात कोणत्या देवीची सेवा करावी? नेमके काय अर्पण करावे? जाणून घेऊया...

मेष: या राशीच्या लोकांसाठी स्कंदमातेची पूजा विशेष फलदायी ठरू शकते. देवीला दुधापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ किंवा खीर अर्पण करावी. लाल फुले अर्पण करावीत, तसेच सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करावे. हे सर्व केल्याने स्कंदमातेचा आशीर्वाद कायम राहू शकेल.

वृषभ: या राशीच्या लोकांनी या नवरात्रीत पांढर्‍या वस्तू अर्पण करून महागौरीची पूजा करावी. असे करणे शुभ मानले गेले आहे. या नवरात्रीत सप्तश्लोकी स्तोत्राचे पठण करणे उन्नतीकारक ठरू शकते.

मिथुन: या राशीच्या लोकांनी दुर्गेच्या ब्रह्मचारीणी रूपाचे पूजन करावे. यामुळे घरात सुख-शांती नांदू शकेल. ब्रह्मचारीणी देवीला साखर आणि पंचामृत अर्पण करावे. माता ब्रह्मचारीणीची विशेष कृपा लोकांवर राहू शकेल.

कर्क: या राशीच्या माता शैलपुत्रीचे मनोभावे पूजन करावे. तसेच दही, भात आणि बताशा अर्पण करावे. यांमुळे त्रासांपासून दिलासा मिळू शकेल. दुर्गा मातेसोबत भगवान शिवाचीही पूजा करावी.

सिंह: या राशीच्या लोकांनी दुर्गेच्या कुष्मांडा रूपाचे नामस्मरण आणि पूजन करावे. कुंकू अर्पण करावे. मातेची आरती करावी. दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.

कन्या: या राशीच्या लोकांसाठी ब्रह्मचारिणी देवीचे मनोभावे पूजन करणे विशेषतः फलदायी ठरू शकते. देवीला दूध आणि तांदळाची खीर अर्पण करावी. सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

तूळ: या राशीच्या लोकांनी दुर्गा सप्तशतीचे पठण करून महागौरी मातेला लाल वस्त्रे अर्पण करावी. असे केल्याने कुटुंबात सुख-शांता नांदू शकेल.

वृश्चिक: या राशीच्या लोकांनी दुर्गा मातेच्या कालरात्री स्वरूपाची पूजा करावी. नवरात्रात ९ दिवस देवीची सकाळी आणि सायंकाळी आरती करावी. जास्वदाचे फूल आणि गूळ अर्पण करावा.

धनु: या राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. पिवळ्या रंगाची मिठाई देवीला अर्पण करावी.

मकर: या राशीच्या लोकांनी कात्यायनी मातेचे पूजन करावे. तसेच नारळाची वडी, बर्फी अर्पण करावी. असे करणे शुभ पुण्यदायी मानले गेले असून, मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

कुंभ: या राशीच्या लोकांनी भगवती देवीच्या कालरात्री रूपाचे पूजन करावे. तसेच गोडाचा शिरा अर्पण करावा. देवी कवच पठण करावे. असे केल्याने आर्थिक वृद्धी होऊ शकते. घरात सुख-समृद्धी नांदू शकते.

मीन: या राशीच्या लोकांनी नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. चंद्रघंटा मातेला केळी, पिवळी फुले अर्पण करावीत. यामुळे सर्व अडचणी दूर होऊ शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.