Numerology: ‘या’ ६ मूलांकांना धनलाभाचे योग! नवी दिशा मिळेल, आत्मविश्वास वाढेल; यश, प्रगतीकारक काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:02 PM2022-12-04T15:02:07+5:302022-12-04T15:08:00+5:30

Numerology: तुमचा मुलांक कोणता? आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना भरघोस लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

डिसेंबरचा महिना ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून चांगला मानला जात आहे. इंग्रजी वर्षाचा शेवटचा महिना खास असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात तीन महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत असून, याचा प्रभाव मूलांकांवरही पडेल, असे सांगितले जात आहे. (Numerology December 2022)

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. मूलांक ६ चा स्वामी शुक्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे.

अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ असलेल्या लोकांची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींनी विचारपूर्वक काम केल्यास फायदा होईल. उत्पन्नाच्या बाबतीत मूलांक ८ असलेल्या लोकांसाठी आगामी काळ अनुकूल राहील. तुमचा मूलांक कोणता? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत विराजमान होणार आहे. नवीन विचार आणि उत्साहाने कामे पार पाडाल. चांगले परिणाम मिळू लागतील. अनावश्यक बाबींमधील वाद मोठ्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून त्रास सहन करावा लागू शकतो. शक्य असल्यास नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. तुमचे काम उत्तम होऊ शकेल. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ घालवू शकाल. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. शक्य असल्यास गुरुवारी विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे उपयुक्त ठरेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. आगामी काळात ग्रहांची साथ मिळेल. ज्ञानाची आणि बौद्धिक क्षमतेची सर्वत्र प्रशंसा होईल. बौद्धिक क्षमतेच्या बळावर अनेक कामे यशस्वीपणे पार पडतील. आयुष्याला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळताना दिसेल. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ आहे. नोकरदारांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या आगामी काळात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. नवीन योजनांचा विचार कराल. मोठे काम करण्याची प्रेरणा मिळेल. नोकरी व्यवसायाशी निगडित लोकांसाठी खूप प्रभावी कालावधी ठरेल. अधिकारी प्रशंसा करतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आगामी काळात भावनिक निर्णय आणि आवेशात कोणतेही नवीन कार्य सुरू करू नका. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही. विचारपूर्वक कृती करावी. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. आगामी काळात रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. मित्रांशी मतभेद होऊ शकतात. दाम्पत्य जीवनात नाराजीचा सूर येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. ध्यानधारणा आणि प्राणायाम आरोग्यासाठी आणि तुमच्या मानसिक शांतीसाठी आवश्यक आणि प्रभावी ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आगामी काळात सावधगिरीने कामे करावीत. हळुहळू वेळ तुमच्या अनुकूल होईल. मित्रांसोबत कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल. बुद्धिमत्ता, वाणी आणि वाणिज्यिक कौशल्य यांचा मिलाफ व्यावसायिकांना लाभदायक ठरेल. प्राणायाम आणि ध्यानधारणा मानसिक स्थिरता देऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आगामी काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. हा काळ तुमच्यासाठी विशेष अनुकूल आहे. या कालावधीचा फायदा घ्या. प्रयत्न वाढवा. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही अनुकूल काळ आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. जीवनाचा आनंद घ्याल. वडिलधार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या सहकार्याने अडचणीतून मार्ग सापडू शकेल. आयुष्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळताना दिसेल. कापड, सौंदर्य प्रसाधने आणि गृह सजावटीशी संबंधित लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होताना दिसतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.