'डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका' कारण समुद्रशास्त्र उलगडते डोळ्यांवरून भविष्य! By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:00 AM 2021-08-02T08:00:00+5:30 2021-08-02T08:00:07+5:30
'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' ही किमया फक्त डोळ्यांना साधता येते. डोळ्यांची रचना आणि बुब्बुळांचा रंग आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालतो. समुद्रशास्त्रात शरीर अवयवांच्या रचनेच्या आधारे व्यक्तीचे स्वरूप, स्वभाव, व्यक्तिमत्त्व याबद्दल भाकीत सांगितले जाते. त्यालाच समुद्रज्योतीष असेही म्हणतात. यापूर्वीही आपण समुद्रशास्त्रावर आधारित विषय जाणून घेतले. आज आपण डोळे काय भाकीत सांगतात, हे जाणून घेऊ. तपकिरी डोळे: हे लोक सामान्यतः खूप हुशार मानले जातात, परंतु या व्यतिरिक्त, त्यांच्याकडे अनेक वैशिष्ट्ये असतात. हे लोक खूप सर्जनशील आणि मनाने खूप कणखर असतात. हे लोक कधीकधी कठोर निर्णय घेतात. या लोकांमध्ये एक विशेष प्रकारचे आकर्षण असते, त्यामुळे ते जिथे जातील तिथे आकर्षणाचे केंद्र बनतात.
राखाडी रंगाचे डोळे: असे लोक सहजपणे कोणाच्याही चर्चेत येतात. त्यांच्याकडे पारखी नजर असते. समोरच्याच्या ओळखण्यात ते सहसा चुकत नाहीत. ते ज्यांच्यावर विश्वास टाकतात ते त्यांच्याशी आयुष्यभराचा ऋणानुबंध जुळवून घेतात. हे लोक शिक्षण क्षेत्रात चांगले काम करतात.
हिरव्या रंगाचे डोळे : असे डोळे आपल्या देशात क्वचितच आढळतात. परदेशात अशा लोकांची संख्या जास्त आहे. आपल्याकडे त्यांची संख्या कमी असली, तरी हे लोक आपल्या कामगिरीने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजावर उमटवतात. त्यांना नेतृत्व करणे आणि लोकांची मने जिंकणे सहज जमते.
निळे डोळे: निळ्या डोळ्यांचे लोक खूप आकर्षक असतात आणि ते स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला खूप महत्त्व देतात. त्यांचे सुंदर निळे डोळे त्यांची ओळख बनते. असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यात पैसा-प्रसिद्धीची कमतरता नसते. असे लोक सामाजिक बांधिलकी जपतात.
विटकरी डोळे: लालसर -विटकरी डोळे असलेले लोक उग्र दिसतात. त्यांचा स्वभाव कणखर असतो. लोक त्यांना घाबरून असतात. हे लोक अचूक निर्णय घेतात. इतरांबद्दल चटकन मत बनवतात. ते खूप मेहनती असतात आणि त्यांना स्वाभिमानाशी तडजोड केलेली चालत नाही.
काळे डोळे: साधारणपणे बहुतेक लोकांचे डोळे काळे असतात. परंतु त्यातही ज्यांचे डोळे गडद काळे आणि भावुक असतात, ते लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. हे लोक आश्वासनांवर ठाम असतात आणि घेतलेली जबाबदारी पार पाडतात. तसेच ते विश्वसनीय असतात.