'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय? वाचा By देवेश फडके | Published: January 17, 2021 07:49 PM 2021-01-17T19:49:39+5:30 2021-01-17T19:56:10+5:30
श्रीविष्णूंचे दशावतार सर्वश्रुत आहेत. त्यातील सर्वाधिक गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे जन्मापासून ते अवतारकार्य समाप्तीपर्यंतचे संपूर्ण जीवन संघर्षमय असल्याचे पाहायला मिळते. देवकी आणि श्रीकृष्णाचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पूजा झाल्याचे दिसून येत नाही. देशात असे एक स्थळ आहे, जेथे बाळकृष्णाची देवकी मातेसह पूजा केली जाते. जाणून घेऊया... भारतात विविध देवतांची हजारो मंदिरे असल्याचे पाहायला मिळते. देशभरातील कोट्यवधी भाविक आपल्या आराध्य देवतेचे न चुकता पूजन, भजन, नामस्मरण करत असतात. तसेच मंदिरात जाऊनही आपापल्या आराध्य देवता, कुलदेवता यांचे दर्शन घेत असतात. देशातील अनेक मंदिरे ही हजारो वर्षांपूर्वी बांधली गेली आहेत. देशातील मंदिरांना केवळ धार्मिक, सांस्कृतिक नाही, तर ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. शेकडो मंदिरे ही स्थापत्य कलेचा अद्भूत नमुना म्हणून गणली गेलेली आहेत.
श्रीविष्णूंचे दशावतार सर्वश्रुत आहेत. त्यातील सर्वाधिक गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. भगवद्गीतेच्या माध्यमातून अवघ्या जगाला अमोघ आणि अमूल्य ज्ञान देणारा श्रीकृष्ण अनेकार्थाने अद्भूत, विशेष आणि वेगळा ठरतो. श्रीविष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाची देशभरात अनेक मंदिरे आढळून येतात.
श्रीकृष्णाचे जन्मापासून ते अवतारकार्य समाप्तीपर्यंतचे संपूर्ण जीवन संघर्षमय असल्याचे पाहायला मिळते. जन्मतःच आईपासून ताटातूट झाल्यामुळे देवकी आणि श्रीकृष्णाचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पूजा झाल्याचे दिसून येत नाही. मात्र, देशात असे एक स्थळ आहे, जेथे बाळकृष्णाची देवकी मातेसह पूजा केली जाते. भारतातील या एकमेवळ मंदिराविषयी जाणून घेऊया...
देवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असल्याचे मंदिर गोव्यात आहे. एकूणच कोकण म्हटले की, नारळी-पोफळीच्या बागा, स्वच्छ नेटका, भला मोठा समुद्र किनारा, कोकणातील मंदिरे, मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, मंदिरांचा इतिहास, स्थानांचे ऐतिहासिक महत्त्व, स्थापत्यकलेचे अप्रतिम दर्शन असे अनेकविविध घटक पटकन डोळ्यासमोर येतात. गोव्यात अनेक मंदिरे स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य, इतिहास, आख्यायिका, मान्यता अगदी वेगळ्या आणि विशेष असल्याचे पाहायला मिळते.
गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या माशेल या गावी देवकीकृष्णाचे मंदिर आहे. या मंदिराची मूळ स्थापना मांडवी नदीतील चोडण या बेटावरील गावात करण्यात आली होती. मात्र, पोर्तुगीज शासकांनी आक्रमण करून हे मंदिर उद्ध्वस्त केले. इ.स. १५३० ते १५४० च्या सुमारास पोर्तुगीजांपासून संरक्षण व्हावे, यासाठी या मंदिरातील मूर्ती सुरक्षित जागी नेण्यात आल्या.
यानंतर इ.स. १५४० ते १५६७ या दरम्यानच्या कालावधीत देवकीकृष्ण मंदिराची उभारणी माशेल या गावी करण्यात आल्याचे सांगितले जाते. या गावात सुमारे वेगवेगळ्या देवतांची पंधरा मंदिरे पाहायला मिळतात. या मंदिराला लक्ष्मी रवळनाथ किंवा देवकी कृष्ण रवळनाथ मंदिर असेही म्हटले जाते. सुरुवातीला छोट्या स्वरुपात असलेल्या या मंदिराचा सन १८४२ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आल्याचे सांगितले जाते.
देवकीकृष्ण मंदिर परिसरात रवळनाथ आणि लक्ष्मी देवी विराजमान असल्यामुळे याला लक्ष्मी रवळनाथ असेही म्हटले जाते. याच मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक छोटेखानी मंदिर आहे. याला मंदिराला पिसो रवळनाथ असे संबोधले जाते. देवकीकृष्ण मंदिराचा परिसर हा अत्यंत विलोभनीय, शांत आणि मनमोहक असा आहे.
गोव्यातील छोट्या किंवा मोठ्या मंदिरांची संरचना अगदीच वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे पाहायला मिळते. किंबहुना बहुतांश मंदिरांची रचना एकसारखीच असल्याचे दिसते. देवकीकृष्ण मंदिराची रचनाही अशीच आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात देवकी माता आणि बाळकृष्ण यांच्या मूर्ती आहेत. देवकी मातेच्या हातात बाळकृष्ण आहे. या प्रकारची मूर्ती अद्वितीय मानली गेली आहे.
देवकी माता आणि बाळकृष्णासह या मंदिरात भौमिका देवी, लक्ष्मी रवळनाथ, कात्यायणी आदी देवताही विराजमान आहेत. देवकी माता आणि बाळकृष्णाचे पूजन केले जाणारे हे देशातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा जत्रौत्सव, नवरात्रौत्सव हे दोन मुख्य उत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे केले जातात.