Pandav Panchami 2021: आज पांडव पंचमी : जाणून घ्या, पांडव जिथून स्वर्गस्थ झाले त्या गावाबद्दल रोचक माहिती! By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:22 AM 2021-11-09T11:22:30+5:30 2021-11-09T11:28:11+5:30
Pandav Panchami 2021: भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी असेल, तर एकदा तरी या अद्भुत ठिकाणी अवश्य जाऊन या. या गावाचे नाते महाभारताशी जोडलेले आहे असेही सांगितले जाते. असे म्हणतात की याच मार्गावरून पुढे पांडव स्वर्गाच्या दिशेने गेले. या गावाशी संबंधित ५ रोचक गोष्टी जाणून घेऊ. त्यासाठी लेख शेवट्पर्यंत अवश्य वाचा. माणा या गावाचे पौराणिक नाव मणिभद्र असे आहे. इथे अलकनंदा आणि सरस्वती नदीचा संगम पाहायला मिळतो.
माणा येथे सरस्वती नदीवर भीम पूल आहे. त्याचे नाव असे असण्यामागेही पौराणिक कथा अशी आहे की, पांडवांनी स्वर्गाच्या दिशेने प्रयाण करत असताना वाटेत आलेल्या सरस्वती नदीला वाट करून देण्याची विनंती केली. परंतु तिने ती विनंती अमान्य केल्यामुळे भीमाने दोन मोठ्या अचाट शिळा त्या नदीवर टाकल्या आणि भीम पूल बांधला गेला. आजही भीम पूल अजून भक्कम स्थितीत आहे.
गणपती बाप्पा जेव्हा तिथे वेद लिहायला बसले तेव्हा सरस्वती नदीचा उसळता प्रवाह आणि त्याचा खळखळाट ऐकून बाप्पाने नदीला आवाज कमी करण्याची विनंती केली. सरस्वती नदीने ती विनंतीदेखील अमान्य केली. तेव्हा बाप्पाने रागाच्या भरात शाप दिला, की इथून पुढे तू कोणालाच दिसणार नाही. त्यामुळे सरस्वती नदीचा तिथे शेवट होऊन ती अलकनंदा नदीत मिसळून लोप पावते.
तिथे एक व्यासांचे मंदिर आहे. असे म्हणतात की ते मंदिर आज जिथे स्थित आहे, त्याच जागेवर बसून महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली आणि लेखनिक झालेल्या गणपती बाप्पाने तिथे बसून महाभारत लिहून काढले.
तिथे वसुधारा नावाचा एक धबधबा आहे. तो ४०० फूट उंचावरून कोसळतो. त्याचे दुधाळ, फेसाळ पाणी खाली येताना पाहणे म्हणजे जणू शुभ्र मोत्यांची लड अंगावर घेण्यासारखे आहे. या धबधब्याबाबत एक समज आहे, की पापी माणसाच्या अंगावर ते पवित्र पाणी पडत नाही. त्यामुळे आपण पुण्यवान आहोत की पापी याची शाहनिशा करण्यासाठी का होईना भारताच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या गावी एकदातरी भेट दिलीच पाहिजे.