Pitru Paksha 2022: विशेषतः पितृपक्षात त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प शांती का केली जाते, वाचा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 05:03 PM 2022-09-14T17:03:00+5:30 2022-09-14T17:07:27+5:30
Pitru Paksha 2022: ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूमुळेच काल सर्प दोष होतो आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा त्याला पूर्ण कालसर्प योग म्हणतात. काल सर्प दोषाचे १२ प्रकार आहेत. काल सर्प दोषाची पूजा उज्जयज (मध्य प्रदेश), ब्रह्मकपाली (उत्तराखंड), त्रिजुगी नारायण मंदिर (उत्तराखंड), प्रयाग (उत्तर प्रदेश), त्रिनेश्वरम वासुकी नाग मंदिर (तामिळनाडू) इत्यादी ठिकाणी केली जाते. तसेच त्र्यंबकेश्वर ( महाराष्ट्र) येथेही कालसर्प शांती केली जाते.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकजवळच्या गोदावरी किनाऱ्यावरील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथेच विशेषतः श्राध्दपक्षात काल सर्प दोष शांती केली जाते. हे शिवाचे स्थान असल्यामुळे तिथे केलेली कालसर्पदोष शांती जास्त प्रभावी ठरते.
दरवर्षी लाखो लोक काल सर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी येतात. असे म्हटले जाते की येथे शिवलिंगाचे दर्शन घेऊन शांती केल्यावर काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी आणि नारायण नागबली यांची पूजा या स्थानी केली जाते.
असे म्हटले जाते की या मंदिरात 3 शिवलिंगांची पूजा केली जाते, जे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखले जातात.मंदिराजवळ ३ पर्वत आहेत, ज्यांना ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगा द्वार म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वत हे भगवान शिवाचे रूप आहे, निलगिरी पर्वताला निलांबिका देवी आणि दत्तात्रेयाचे मंदिर आहे आणि देवी गोदावरी मंदिर गंगा द्वार पर्वतावर आहे.
येथे काल सर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण पूजा विधि केले जातात, ज्यात किमान ३ तास लागतात.
तीन डोळ्यांच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण त्र्यंबक (तीन डोळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणे त्र्यंबकेश्वर महाराज हे येथील राजा मानले जातात. अशा ठिकाणी केलेली पूजा, शांती अतिशय प्रभावी ठरते व आयुष्यातील अडथळे दूर होतात, असा भाविकांचा अनुभव आहे.