पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 03:24 PM 2024-09-20T15:24:38+5:30 2024-09-20T15:50:23+5:30
Pitru Paksha 2024: पवित्र मानल्या गेलेल्या तुळसीचे काही उपाय पितृपक्षात करणे पुण्य लाभदायी मानले गेले आहे. जाणून घेऊया... Pitru Paksha 2024: मराठी वर्षातील चातुर्मास सुरू आहे. भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पितृपक्ष, पितृ पंधरवडा साजरा केला जातो. यातील तिथींना पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे शास्त्र सांगते. देवतांप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते, असे सांगितले जाते.
पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही सोपे उपाय केल्यास पूर्वज प्रसन्न होऊ शकतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. आर्थिक स्थिती जसजशी सुधारेल तसा दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते. पितृपक्षात तुळसविषयक नेमके कोणते उपाय उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात, ते जाणून घेऊया...
भारतीय संस्कृती आणि परंपरेत तुळशीचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे. तुळशीचे रोपटे घरात लावणे सुख, समृद्धी, भाग्यकारक मानले जाते. तुळस विष्णूला प्रिय असल्याचे म्हटले जाते. तसेच अनेक कार्यात तुळशीचा आवर्जून वापर केला जातो. केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीने तुळस गुणकारी मानली गेली आहे.
तुळशीचे रोपटे सर्वांत पवित्र मानले जाते. श्राद्ध तर्पण विधी करताना पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी तुळशीचा वापर करावा. हा छोटासा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो. असे केल्याने केवळ पूर्वजांचा नैवेद्य शुद्ध होणार नाही, तर घरात सकारात्मकता येऊ शकते, असे सांगितले जात आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाते त्या दिवशी तुळशीचे रोपटे एका भांड्यात ठेवावे. पूर्वजांचे स्मरण करून उजव्या हाताने जल अर्पण करा. यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागात शिंपडावे. जे पाणी शिल्लक आहे, ते तुळशीला घालून टाकावे.
पितृपक्षात कोणत्याही दिवशी तुळशीची माळ धारण करू शकता. हे करताना तुळशीच्या माळा संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्यावी. पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतील. देवी लक्ष्मीची कृपा संपूर्ण घरावर राहील.
पितृपक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीला चंदन अर्पण करावे. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच तुळशी रोपाच्या ठिकाणी चंदनाने स्वस्तिक बनवा. त्यानंतर तुपाचा दिवा अवश्य लावा.
पितृपक्षातील कोणत्याही सोमवार, मंगळवार किंवा बुधवारी कापूर लावून तुळशीची पूजा करावी. या तीन दिवसांना पितरांची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी प्रथम तर्पण करावे व नंतर तुळशीसमोरील दिव्यात कापूर प्रज्वलित करावा. असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जाते.
सर्व कामात वारंवार अपयश येत असेल तर तुळशीची नियमितपणे पूजन करावे. हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता, पण पितृपक्षात तो उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. सर्व अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.