PM Narendra Modi Birthday: PM मोदींच्या कुंडलीत ‘लक्ष्मी योग’! अद्भूत राजयोगामुळे वर्षभर शुभ काळ; वर्चस्व कायम राहणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 03:54 PM 2022-09-17T15:54:06+5:30 2022-09-17T16:01:31+5:30
PM नरेंद्र मोदींसाठी आगामी वर्षे अत्यंत महत्त्वाची असून, भाजप सत्तेची आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करू शकतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशासह जगभरातील अनेक नेते, दिग्गज मंडळी पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. आगामी काळात होणाऱ्या गुजरात विधानसभा आणि सन २०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान मोदींसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. यातच आगामी वर्ष मोदींसाठी कसे असेल, मोदी सरकार कोणत्या नीती प्रभावी ठरू शकतील, ते जाणून घेऊया... (PM Narendra Modi Birthday)
ज्योतिषशास्त्रानुसार, ३० , ३६, ४८, ६० आणि ७२ ही वर्षे जीवनात मोठी बदल घडवून आणणारी ठरतात. वयाच्या ७२ व्या वर्षी गुरु ग्रह जन्मकालीन स्थितीची ६ चक्रे पूर्ण केलेली असतात. (१२ x ६ = ७२) आणि राहु आणि केतु आपली ४ चक्रे पूर्ण केलेली असतात. (१८ x ४ = ७२). ७२ व्या वर्षी एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य, मानसिक आणि वैचारिक स्थितीत मोठे परिवर्तन घडून येऊ शकते, अशी मान्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील मेहसाणा येथील वडनगर येथे झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मकुंडली वृश्चिक राशीची आहे. ज्यामध्ये चंद्र आणि मंगळाचा 'लक्ष्मी योग' तयार होत आहे, त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून प्रथम गुजरात आणि नंतर दिल्लीत पंतप्रधान मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले असून, सत्ता सुख उपभोगत असल्याचे सांगितले जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, पंतप्रधान मोदींची सध्या मंगळावर गुरुची विंशोत्तरी दशा एप्रिल २०२२ ते मे २०२३ पर्यंत आहे. मंगळ हा लग्न स्थान आणि सहाव्या स्थानाचा स्वामी असून, गुरु द्वितीय (पैसा) आणि पाचव्या (धोरणात्मक निर्णय आणि सल्लागार) स्थानाचा स्वामी असल्याने येत्या काही महिन्यांत तो देशात नवीन आर्थिक धोरणांत मोठे बदल, बँकिंग क्षेत्रातील आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई होण्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.
परंतु, अंतरदशनाथ गुरु वक्री असून, मंगळ आणि शनी अशुभ नक्षत्रात असल्याने या दोन्ही ग्रहांच्या दृष्टीने काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच आगामी काळात आरोग्यासंबंधी काही त्रास होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ष कुंडली वृषभ राशीची आहे, ज्यामध्ये चंद्र आणि मंगळ तयार होत आहेत. वार्षिक कुंडलीत सातव्या स्थानी असल्याने देशाच्या परराष्ट्र धोरणात नवीन आक्रमकता आणि आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे संकेत आहेत. लडाखमधील लष्कर मागे घेण्याची भारताची अट नुकतीच चीनने मान्य केल्यानंतर आता अरुणाचल प्रदेशात चीनने लष्करी हस्तक्षेप केल्यास नवल वाटून घेऊ नये, असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या वर्षाच्या कुंडलीत सप्तम स्थानावर असलेल्या मंगळाची दृष्टी परराष्ट्र धोरणातील नवीन आव्हानांचे स्पष्ट संकेत देणारी असल्याचे सांगितले जात आहे. कुंडलीत धनेश आणि पंचमेश बुध पाचव्या भावात सूर्यासोबत चौथ्या घराचा स्वामी असल्याने मोठा राजयोग तयार होत आहे.
या राजयोगावर लाभ स्थानी गुरुची पडणारी दृष्टी पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणातील प्रमुख सुधारणा, व्यवसाय सुलभ करण्यासाठी नवीन धोरण आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीद्वारे पैसा उभारण्याच्या प्रयत्नांचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरुवात केली असून, भाजप सत्तेची आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करू शकतात का, याकडे केवळ देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, सदरमधील कोणत्याही दाव्याची पुष्टी करण्यात आलेली नाही.