पं. भीमसेन जोशींच्या भक्तिगीतांशिवाय आषाढी-कार्तिकी अपूर्णच; करूया निवडक गाण्यांची उजळणी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 07:00 AM 2023-11-23T07:00:00+5:30 2023-11-23T07:00:02+5:30
संतांच्या अभंगरचना जितक्या भावपूर्ण तेवढाच त्या शब्दांची आर्तता जागवणारा भक्तिमय स्वर आहे पं. भीमसेन जोशींचा. सुदैवाने आपण ज्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो तिथे साहित्य, संगीत यात जीव ओतणाऱ्या कलाकारांची अजिबात कमतरता नाही. तरी काही स्वर हे एकमेवाद्वितीय असतात. भीमसेनजींचा सूरही त्यापैकीच एक! आषाढी कार्तिकी एकादशीला त्यांची अभंगवाणी कानावर पडल्याशिवाय उत्सव साजरा झाला असे वाटणारच नाही. म्हणून विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघण्यासाठी करूया त्यांनी अजरामर केलेल्या निवडक भक्तिगीतांची उजळणी! टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग आणि इंद्रायणी काठी जमलेल्या भक्तमेळ्याचे हे वर्णन! भगवंताच्या दालनात आल्यावर रंक आणि राव हा भेदभाव उरतच नाही. तिथे त्याच्या समचरणाशी सगळे सम होतात. विठ्ठल नामात रंगून जातात. पंढरपूर भक्तांनी फुलून जाते. पायरी असो नाहीतर खांब अथवा कळस, या भक्तिमंदिरात सगळेच विठ्ठलमय होतात.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥ एकनाथ महाराजांनी या अभंगात पांडुरंगाशी झालेली एकरूपता शब्दबद्ध केली आहे. प्रत्येक रंध्रातून विठ्ठलनाम कसे उमटते हे तेसांगतात. ही एकात्मता, एकरूपता पावल्यावर भक्त भगवंत हा भेद उरतच नाही.
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥ वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना ठाऊक असते, की आषाढी- कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला भक्त गर्दी करणार. अशात पांडुरंगाच्या पावलांचे दर्शन दुर्मिळच. म्हणून काही भाविक कळसाचे दर्शन घेऊन परततात तर काही पायरीवर डोके ठेवून मनोमन नमस्कार करून निघतात. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तुझे रूप मनावर एवढे ठासले आहे की आता दुसरे काही पाहण्याची इच्छाच उरली नाही. अशात तुझे दर्शन घडले तर जन्मोजन्मीची प्रवासाचा शीण निघून जाईल.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥ संत नामदेवांचा हा अभंग म्हणजे बसल्या जागी पंढरपूर दर्शन घेण्यासारखे आहे. इथेही विठ्ठलमय झालेल्या भक्तांची अवस्था मांडली आहे. आई, वडील, भाऊ, सखा, यत्र तत्र सर्वत्र पांडुरंग दिसतो, नव्हे तर ती रूपे पांडुरंगाचीच आहेत अशी भक्तांची ठाम श्रद्धा बसते आणि विठ्ठल सापडल्याचा आनंद ते व्यक्त करतात.
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥ पांडुरंगाचे सावळे सुंदर रूप आणि त्याची मोहिनी संतांना भारावून टाकते. म्हणूनच ते म्हणतात, हे रूप सावळे असूनही आम्हाला प्रिय आहे आणि ते निरंतर हृदयात राहावे अशी आमची इच्छा आहे. ही केवळ एका जन्माची इच्छा नाही तर जन्मोजन्मीची इच्छा आहे, हे मागणे आमच्या पदरात घाल.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटताचि। संत सेना न्हावी यांचा हा अभंग म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांचे मनोगतच म्हणावे लागेल. वारीतून मिळणारा आनंद शब्दातीत आहे. त्याचे वर्णन सेना महाराज करतात, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनि अवघी तीर्थे! जिवाशिवाच्या भेटीचा हा सुखद क्षण वारीत अनुभवता येतो.
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी । माहेर हा शब्द स्त्रियांसाठी जेवढा जिव्हाळ्याचा विषय आहे, तेवढा पंढरपूर हा विषय वारकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा आहे. म्हणून संत एकनाथ महाराज पंढरी हे भक्तांचे माहेर आहे आणि तिथली मंडळी ही आपल्या जिव्हाळ्याची माणसं आहेत असे ते म्हणतात. अशाच माहेरात भावभक्तीचा सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी भाविक जातात, वारी करतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात. ही अनुभूती भीमसेनजींच्या स्वरातून मिळते म्हणून त्यांनाही नमन!