Puja Tips: पूजा करताना अजाणतेपणीही करू नका 'या' चुका; होऊ शकते नुकसान! By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 02:44 PM 2022-07-14T14:44:57+5:30 2022-07-14T14:56:07+5:30
Puja Tips: आपण दररोज देवाची पूजा करतो. पूजा देवाची करत असलो तरी पूजेचे समाधान आपल्याला मिळते. मनःशांती लाभते. प्रसन्न वाटते. म्हणून देवाचिया द्वारी क्षणभरी उभे राहून आपण देवपूजा नित्यनेमाने करतो. तसेच कधी कधी सण सोहळ्याच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते. जसे की श्रावणात महादेवाची, भाद्रपदात गणपतीची, नवरात्रात देवीची, तसेच सत्यनारायण पूजा, गृह्प्रवेशाच्या वेळी गणेशपूजा आपण करतो. मात्र पूजा करताना कधी कधी आपल्याकडून अनावधानाने काही चुका घडतात. त्यामुळे सगळ्या पूजेचे गोळा केलेले पुण्य वाया जाते आणि मनाला रुखरुख लागते. यासाठी काही नियम आठवणीने लक्षात ठेवले पाहिजेत. ते नियम पुढीलप्रमाणे-
देवाला स्नान घालताना प्लॅस्टिक किंवा स्टीलचे भांडे न वापरता तांब्याचा, पितळ्याचा नाहीतर चांदीचा कलशच वापरावा. अन्य धातू देवपूजेसाठी पवित्र मानले जात नाहीत.
आपण जसे आपल्या आप्तजनांना आवडत्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि देतो त्याचप्रमाणे देव पूजेतही ज्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्याच अर्पण कराव्यात. आणि ज्या आवडत नाहीत त्या चुकूनही अर्पण करू नये. जसे की भगवान विष्णूला तांदूळ, गणेशाला तुळशी आणि देवीला दुर्वा तसेच सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्थात बेल अर्पण करू नये!
पूजा करताना पूजा होईपर्यंत दिवा मालवणार नाही अशा बेताने त्यात तेल, तूप घालून पुरेल अशी वात ठेवावी. वाऱ्याने दिवा मालवल्यास पुन्हा लावावा, मात्र पूजा होईपर्यंत दिवा पूर्णवेळ ठेवावा. अन्यथा मनाला रुखरुख लागते.
दिव्याने दिवा लावू नये, कारण पूजा करताना आपण एकाच वेळी देवांना स्नान, धूप दीप उदबत्ती ओवाळणे, गंध उगाळणे, फुलं अर्पण करणे, स्तोत्र म्हणणे अशा गोष्टी करत असतो. परंतु त्यातच दिव्याने दिवा लावताना थोडी जरी गडबड झाली तरी अपघात होऊ शकतो. म्हणून तसे करणे टाळावे आणि काडेपेटीतील काडीने दिवा प्रज्वलीत करावा.
पूजा करताना, मग ती दैनंदिन देवपूजा असो किंवा नैमित्तिक सत्यनारायण किंवा तत्सम पूजा, त्यावेळेस तुमच्या मालकीची सोन्याची अंगठी असेल तरच ती घाला, दुसऱ्या कोणाची अंगठी घालून पूजा केल्यास ते दारिद्रयाला आमंत्रण ठरू शकते!
सपत्नीक पूजा करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे असे शास्त्र सांगते. तिला वामांगी म्हणतात, कारण ती पुरुषाची डावी बाजू अर्थात कमकुवत बाजू सांभाळणारी असते. म्हणून तिला नेहमी डाव्या बाजूला बसवूनच पूजा केली पाहिजे.