Rahu Ketu Upay: तुम्हाला राहु-केतुची महादशा आहे? ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:19 AM2022-03-14T07:19:35+5:302022-03-14T07:25:52+5:30

Rahu Ketu Upay: राहु आणि केतुचे प्रभाव मोठ्या प्रमाणावर होतात, असे सांगितले जाते. तुमची महादशा सुरु असल्यास नेमके काय करावे, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात राहु-केतु यांना छाया ग्रह मानण्यात आले आहे. सन २०२२ मधील राहु-केतुचे राशीपरिवर्तन अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. राहु-केतुच्या राशीबदलाचे प्रभाव आणि परिणाम दीर्घकालीन असतात. राहु-केतु पापकारक ग्रह मानण्यात आले असून, ते कायम वक्री चलनानेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. (Rahu Ketu Upay)

सन २०२२ मध्ये राहु वृषभ राशीतून मेष राशीत, तर केतु वृश्चिक राशीतून तूळ राशीत विराजमान होणार आहे. पुढील सुमारे दीड वर्ष राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत असतील. विशेष म्हणजे राहु आणि केतु एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. (Rahu Ketu Remedies)

एखाद्या व्यक्तीच्या राशीतील राहु आणि केतुचे स्थान तसेच अन्य ग्रहांशी असलेला संबंध यावरून परिणाम व प्रभाव होत असतात, असे सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु-केतुची दशा किंवा महादशा सुरू असेल, तर असे ग्रहमान सदर व्यक्तीला कष्टकारक, समस्याकारक ठरू शकते. (Rahu Ketu Transit 2022)

ज्योतिषशास्त्रातील काही ग्रंथांत राहु-केतुची महादशा सुरू असेल अथवा राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव असल्यास काही उत्तम उपाय उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहेत. मात्र, त्याबरोबर काही गोष्टी लक्षात ठेऊन कार्यरत राहिल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते, असे सांगितले जात आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या... (Rahu Ketu Gochar 2022)

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु-केतुची दशा किंवा महादशा सुरू असल्यास या ग्रहांचा प्रभाव प्रथम विचार, बुद्धीवर होतो. सारासार विचार आणि सद्सद्विवेक बुद्धीची क्षमता क्षीण व्हायला सुरुवात होते. बहुतांश निर्णय द्विधा मनःस्थितीत घेतले जाऊ शकतात.

यामुळे अनेकदा घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरू शकतात. त्याचा वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर परिणाम भोगावे लागू शकतात. नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना किमान दोन वेळा विचार करावा. द्विधा मनःस्थिती झाल्यावर ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रात जेव्हा राहु-केतुचा प्रभाव एखाद्या व्यक्तीवर पडतो किंवा महादशेचा काळ सुरू असतो, तेव्हा नकारात्मकता, नैराश्य यांचा संचार वाढतो. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर नकारात्मक गोष्टीच सदैव दिसत राहतात. एखादी गोष्ट घडत असेल, तरी त्यात नकारात्मकता दिसते. अशावेळी नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्यावर होऊ न देण्याचा प्रयत्न करावा.

आशावादी राहावे. सकारात्मक विचार करत राहावा. सकारात्मकता येण्यासाठी आपल्या आराध्य देवतेचे यथाशक्ती नामस्मरण, जप करावा. धार्मिक ग्रथांचे, पुस्तकांचे वाचन करावे. असे केल्याने राहु-केतुचा दुष्प्रभाव कमी होण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

राहु-केतुची महादशा सुरू असेल, तर त्याचा परिणाम हा करिअर, कार्यक्षेत्र, आर्थिक आघाडीवर दिसून येतो. राहु-केतुच्या प्रभावामुळे वारंवार अडचणी, समस्या, अडथळे अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. नोकरीत, व्यापार, उद्योग, व्यवसायात चिंता वाढवणाऱ्या घटना घडायला सुरुवात होते, असे सांगितले जाते.

मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत निराश, हताश न होता संयम, सामंजस्य, समजुतीने आचार, विचार करावेत. धैर्याने परिस्थिती हाताळावी. काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. नवे विचार घेऊन कार्यरत राहावे. हाती घेतलेले काम उत्तमरितीने कसे करता येईल, यावर भर द्यावा, असे संगितले जाते.

राहु-केतुची महादशा सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. मात्र, त्यातील एक उपाय हा सर्वांसाठी अगदी सहज सोपा आहे. तो म्हणजे चंदनाचा वापर. चंदनाच्या वापरामुळे पापकारक ग्रहांचा प्रभाव निष्क्रिय होऊ शकतो, असे म्हटले जाते.

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहु-केतुच्या महादशा सुरू असेल, त्या व्यक्तींनी पूजा-अर्चा करताना चंदनाचा प्रामुख्याने वापर करावा. चंदनाची अगरबत्ती, धूप यांचा समावेश पूजनात करावा. याशिवाय चंदनाचा समावेश असलेले अत्तर, साबण यांचा वापर करावा. जिथे चंदनाचा वापर करणे शक्य आहे, तेथे तो आवर्जुन करावा. हा उपाय प्रभावशाली मानला जातो. यामुळे राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव तीव्रतेने कमी होण्यास मदत होते, असे सांगितले जाते.