Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:44 IST2025-04-18T12:42:05+5:302025-04-18T12:44:57+5:30
Rahul Mangal Shadashtak Yoga 2025: ज्योतिष शास्त्रानुसार मे महिना ग्रहांच्या दृष्टीने फारच धामधुमीचा असणार आहे. अनेक ग्रह स्थलांतरित होणार आहेत, इतर ग्रहांशी युती करणार आहेत, काही वेळेस पापग्रह एकत्र येणार आहेत, या सगळ्याचा परिणाम राशींवर होणार आहे. तूर्तास आपण राहू-मंगळ षडाष्टक(Rahu Mangal Shadashtak Yoga 2025) योगाबद्दल जाणून घेऊ.

दीड वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राहू ग्रह आपली राशी बदलत आहे. १८ मे रोजी राहू मीन राशी सोडून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यावेळी मंगळ कर्क राशीत असेल आणि राहूसोबत एक अतिशय अशुभ षडाष्टक योग तयार करेल. राहू आणि मंगळ दोघेही स्वभावाने उग्र आहेत. त्यांच्या संयोगामुळे अनेक राशींवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. करिअर, व्यवसाय, नोकरीत मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्या राशी कोणत्या व त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहू.
राहू-मंगळ षडाष्टक योगाचा प्रभाव १८ मे ते ७ जून पर्यंत राहील आणि त्याच्या अशुभ प्रभावामुळे ५ राशी प्रभावित होतील. या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अचानक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मानसिक ताण, गोंधळ, नातेसंबंधातील समस्या, आजार आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पुढील राशींनी वेळोवेळी कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहू.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी, राहूचे संक्रमण संमिश्र परिणाम देईल. कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगायला हवी. राहू तुम्हाला अवैध कामास प्रवृत्त करेल. मात्र त्यातून चुका होण्याची शक्यता आहे. घाईघाईत काम करणे टाळा. जबाबदारी झटकू नका. अन्यथा कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. अतिआत्मविश्वास कामं बिघडवू शकतो. शांत डोक्याने आणि संयमाने केलेले प्रत्येक काम तुम्हाला लाभ देईल. कुटुंबात वादाचे प्रसंग येतील तेव्हा तुम्ही नमते घ्या.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी, राहू आठव्या घरात भ्रमण करेल. आठवे घर अपघाताशी संबंधित आहे. या घरात राहूचे भ्रमण काही बाबतीत तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. कामाचे, व्यवसायाचे ठिकाण असो नाहीतर घर किंवा प्रवास, स्वतःची काळजी घ्या. राहूच्या भ्रमणामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. संसर्गजन्य रोग किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. वेळीच उपचार घेतल्याने भविष्यातील अडचणी टाळता येतील. या कालावधीत नवीन ठिकाणी गुंतवणूक टाळा.
सिंह :
सिंह राशीच्या जातकांसाठी, राहूचे गोचर सातव्या घरात असेल. सातवे घर हे विवाह आणि भागीदारीचे घर आहे. कौटुंबिक नातेसंबंधांना जपा. या काळात जोडीदाराशी विसंवाद होऊ शकतो. विश्वासात घ्या, संवाद साधा, हा कठीण काळ निभावून न्या. वादाचे प्रसंग टाळा.कामावर, व्यवसायावर लक्ष द्या. गरज पडल्यास मित्रपरिवाराला सल्ला घ्या. कोणताही निर्णय घेताना अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या, अन्यथा भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि गरज पडल्यास त्वरित औषधोपचार सुरु करा.
वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी राहूचे गोचर चौथ्या घरात असेल. चौथे घर हे आनंदाचे आणि आईचे घर आहे. राहूचे भ्रमण तुमच्यासाठी फारसे शुभ राहणार नाही. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अंतर वाढू शकते. वादाचे प्रसंग टाळा, गरज पडल्यास मौन पाळा, तरच नात्यांमध्ये दुरावा येणार नाही. कामामध्ये लक्ष केंद्रित करा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायी ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्या, संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी राहूचे भ्रमण मनात चलबिचल निर्माण करणारे ठरेल. राहू स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा तुमच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होईल. अविचाराने घेतलेले निर्णय भविष्यात त्रासदायी ठरतील. राहू तुमच्या मनावर आणि विचारांवर परिणाम करेल. तुम्ही प्रत्येक काम घाईघाईने कराल. यामुळे चुका होण्याची शक्यता वाढेल. तुमच्या जोडीदारावर लक्ष केंद्रित करा. त्यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करा.