Raksha Bandhan 2021 : 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. बहिणीवर बाका प्रसंग आला की भावाचं आणि भावाची बाजू घ्यायची वेळ आली की बहिणीचं प्रेम उफाळून येतं. अशा या नात्याची वीण घट्ट करणारा सण आहे रक्षाबंधनाचा! आपल्या भावाचं सगळं काही छान व्हावं अशी मनोमन प्रार्थना करत बहीण भावाला राखी बांधते आणि दिव्यांनी औक्षण करत उदंड आयुष्य लाभो असे देवाला विनवते. याच इच्छेला दुजोरा देण्यासाठी ज्योतिषशास्त्र सांगते, की भावाच्या राशीला अनुकूल असलेल्या रंगाची राखी त्याच्यासाठी भाग्यकारक ठरेल. म्हणून मैत्रिणींनो, राखीचा पॅटर्न तुमच्या पसंतीचा असला, तरी रंग भावाच्या राशीच्या पसंतीचाच निवडा म्हणजे झालं.