Raksha Bandhan 2022: भावाला राखी बांधताना धाग्याला 'तीन' गाठी बांधायला विसरू नका; जाणून घ्या कारण...! By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:12 PM 2022-08-03T19:12:56+5:30 2022-08-03T19:18:41+5:30
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असे म्हणतात, त्यामागे काय तर्क आहे तो जाणून घेऊ. राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात. पाटाखाली व पाटासभोवती रांगोळी काढतात. पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात. त्याला गंध, अक्षता लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण करतात. त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात.
राखीला तीन गाठी : राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात. पण काही जण त्याजागी तीन गाठी बांधतात. या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू, महेशाला स्मरून बांधल्या जातात. या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात, त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते.
त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क : असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशीसुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते.
तारखेबद्दल संभ्रम श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जात असले तरी, यंदा रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी रक्षाबंधन सण ११ ऑगस्ट रोजी आहे. ज्यामध्ये भाद्र दोष मध्यान्ह व्यापिनी पौर्णिमेला राहतो. पंचांगानुसार, ११ ऑगस्ट रोजी सूर्योदयासह चतुर्दशी तिथी असेल आणि या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी १०: ५८ पासून सुरू होईल, त्यासोबत भाद्रा काळही सुरू होईल. ततो रात्री ८. ५० पर्यंत राहील. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त: ११ ऑगस्ट सकाळी ९. २८ ते रात्री ९. १४ पर्यंत