Raksha Bandhan 2022: सुतक लागलेले असताना रक्षाबंधन करावे का? पाहा, शास्त्र काय सांगते अन् राखी बांधण्याचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:05 AM2022-08-08T08:05:53+5:302022-08-08T08:10:34+5:30

Raksha Bandhan 2022: लांबच्या नातेवाईकाचे राखी पौर्णिमेपूर्वी निधन झाल्यास आपण रक्षाबंधन करू शकतो का? जाणून घ्या, धर्मशास्त्रातील नियम

चातुर्मास सुरू झाला की, श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरू झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. श्रावण महिन्याला सुरुवात झाली की, हळूहळू बाजारात नवनव्या, रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक वाढते. त्यामुळे रक्षाबंधन कधी आहे, त्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचे आराखडे तयार व्हायला सुरुवात होते. (Raksha Bandhan 2022)

बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. यंदाच्या वर्षी सन २०२२ ला ११ ऑगस्ट २०२२ रोजी रक्षाबंधन आहे. बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारी भान कायम राहावे, यासाठी राखी बांधली जाते.

भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन. भावाला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी बहीण प्रार्थना करते. तर बहिणीला वस्त्राभुषणाची भेट देऊन तिला सुख, शांतता, सौभाग्य, समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी भाऊराया प्रार्थना करतो. रक्षाबंधनाचा सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा मानला जातो. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.

लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ-बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी, लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो. बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. (how raksha bandhan celebrate in sutak kaal)

लौकिक स्वरुपात बहिणी भावाला राखी बांधतात आणि भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. हे एक प्रकारचे भक्तीचे आणि वरदानाचे स्वरूप आहे. ज्यामध्ये अलौकिकरित्या अग्निदेव दिव्याच्या धगधगत्या ज्योतीचे साक्षीदार म्हणून उपस्थित असतात. अक्षत, चंदन आणि सिंदूर अलौकिकरित्या देवी लक्ष्मी, सरस्वती आणि गणेश आशीर्वाद बनून या उत्सवात भाऊ आणि बहिणीला शुभाशिर्वाद देतात.

म्हणूनच सोयर किंवा सुतक असताना राखी सण साजरा करू नये, अशी मान्यता आहे. पण सुतकादरम्यानही राखीचा सण साजरा करायचा असेल तर काही नियम पाळले पाहिजेत. यामुळे तुम्ही सुतक मर्यादा पाळू शकाल आणि राखीचा सण तुमच्याकडून चुकणार नाही. धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते तेव्हा जन्माचे सोयर असते. तर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला की सुतक लागते.

एखाद्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर १२ दिवस सुतक पाळले जाते. तर विवाहित मुलीच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिला ४ दिवसांचे सुतक लागते. तसेच घरात मूल जन्माला आल्यानंतर १२ दिवसांचे सोयर असते. या काळात पूजा आणि धार्मिक कार्य केले जात नाही. रक्षाबंधनाच्या दिवसापासून १२ दिवसांपूर्वी कुटुंबात जन्म किंवा मृत्यू झाल्यास सुतक दोष मानले जाईल. (the rules for ties rakhi in sutak)

प्रत्येक कुटुंबात कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे सोयर-सुतक पाळले जाते. प्रत्येक घरातील प्रथा-परंपरा वेगळ्या असतात. सूतकादरम्यान भाऊ-बहिणी त्यांना हवे असल्यास रक्षाबंधन करू शकतात. मात्र, यामध्ये धार्मिक विधींचा समावेश होणार नाही याची काळजी घ्यावी. बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधावी पण तिलक लावू नये. तसेच भावाला औक्षणही करू नये.

या दरम्यान पायांना स्पर्श करून नमस्कार करू नये. केवळ हात जोडून प्रणाम करावा. भाऊ किंवा बहीण, जो कोणी लहान असेल त्याला नमस्कार करून मोठ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावा. सुतक दरम्यान रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधताना मनात राखीच्या मंत्राचे ध्यान करा. राखी बांधा आणि मंत्रोच्चार न करता ती बांधा, असे काही नियम सांगितले जातात. सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, आपापल्या घरातील रिती-परंपरा यांप्रमाणे करावे, असे सांगितले जात आहे.