Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या वेळी भावाच्या औक्षणासाठी ताम्हनात आठवणीने ठेवा 'या' पाच गोष्टी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 12:49 PM 2022-08-08T12:49:46+5:30 2022-08-08T12:54:36+5:30
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भाऊदेखील आपल्या बहिणींना भेटवस्तू देतो आणि त्यांच्या रक्षणाचे वचन देतो. मात्र या उपचारात आणखी एक उपचार महत्त्वाचा असतो, तो म्हणजे औक्षणाचा. त्यामुळे भावाला ओवाळण्यासाठी औक्षण थाळी किंवा ताम्हन तयार कराल, त्यात राखीबरोबरच पुढील गोष्टींचा आठवणीने समावेश करा.
अक्षता - हिंदू धर्मात पूजेच्या ताम्हनात अक्षता ठेवण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. कोणत्याही शुभ कार्यात अक्षताचा नक्कीच समावेश होतो. अक्षता अर्थात तांदूळ हे वैभवाचे, सौख्याचे प्रतीक आहे. त्याला हळद, कुंकू लावून मांगल्य जोडले जाते. अशा अक्षता आशीर्वाद किंवा शुभेच्छा रूपात डोक्यावर टाकल्या जातात. तसेच ओल्या गंधावर अक्षता चिकटवल्या जातात. जितक्या जास्त अक्षता चिकटल्या तेवढे भावाचे प्रेम जास्त असेही गमतीने म्हटले जाते. तसे असले तरी अक्षता लावल्याने भावाला दीर्घायुष्य लाभते आणि वैभव प्राप्त होते अशी श्रद्धा असते.
तुपाचे निरांजन- ताम्हनात चांदीचे किंवा पितळ्याचे निरंजन घ्या. धार्मिक कार्यात तुपाच्या दिव्याचा समावेश केला जातो. विशेषतः औक्षण करताना तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावतात. त्यात तूप घाला आणि तुपाची गोलाकार वात लावा. दिव्याच्या प्रकाशात मनातील अंधार दूर होतो, सकारात्मकता व्यापून राहते. दिव्याने ओवाळले असता भावाचे आयुष्यही दिव्याच्या प्रकाशासारखे तेजस्वी होते आणि त्याच्या आयुष्यातील नैराश्य, दुःख दूर होऊन आयुष्य प्रकाशित होते.
कुंकवाचा टिळा - हिंदू धर्मात कुंकवाला अतिशय महत्त्व आहे. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीकमानले जाते. कुंकवाची लकीर दीर्घायुष्य प्रदान करते. तसेच कुंकू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्याने कुंकवाच्या रूपाने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा या हेतूने भावाला कुंकवाचा टिळा लावावा आणि वरून अक्षता लावाव्यात. कोरडे कुंकू पटकन पुसले जाऊ नये म्हणून त्यात थेंबभर पाणी घालून ओल्या गंधाचे बोट अनामिकेने भावाच्या कपाळाला लावावे.
सुपारी - पूजेत गणपती म्हणून सुपारी वापरली जाते. तसेच धार्मिक गोष्टीत एखाद्या वस्तूचा अभाव असेल तरी सुपारी वापरतात. त्यामुळे पूजेला पूर्णत्त्व येते. म्हणून भावाचे औक्षण करताना सोन्याच्या अंगठीबरोबर सुपारीने देखील ओवाळले जाते. जर सोन्याची अंगठी नसेल तर दोन सुपाऱ्यांनी ओवाळले जाते. सुपारी शुभ मानले जाते. भावाच्या आयुष्यात सर्वकाही शुभ घडावे यासाठी सुपारीने त्याला ओवाळले जाते.
मिठाई - भावाला औक्षण करून मोठा असल्यास नमस्कार करून किंवा छोटा असल्यास आशीर्वाद देऊन झाल्यावर मिठाई भरवावी. हा औक्षणाचा एक भाग नसला, तरी भावाचे तोंड गोड करावे आणि नात्यातला गोडवा वाढावा, यासाठी लोकांनी ही सकारात्मक भर घातली आहे. बहीण भावाच्या नात्यात रुसवे फुगवे सुरू असतात. ते वाद मिटवण्यासाठी नात्यात गोडवा पेरून पुढाकार घ्यावा आणि नाते सुदृढ करावे. आणि हो, हे सगळे उपचार झाले की राखी बांधून भावाबरोबर छानसा सेल्फी घ्यायला विसरू नका.