Relationship Tips: जोडीदाराची निवड करताना 'या' गोष्टी तपासून बघा; तरच मिळेल संसार सुख!- सद्गुरू By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:26 PM 2023-12-20T16:26:16+5:30 2023-12-20T16:33:41+5:30
Relationship Tips: लोक मजेने म्हणतात, लग्न झाले की मनःशांती संपते आणि मनःस्ताप वाढतो. पण तसे नाही तर योग्य व्यक्तीशी लग्न केल्यामुळे मनःशांती मिळते. म्हणूनच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा लग्न संस्थेचा मुख्य पाया सांगितला आहे. पण ती योग्य व्यक्ती निवडायची कशी याचा विचार करत असाल तर सद्गुरु सांगत आहेत काही महत्त्वाच्या सूचना! लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि कलाटणी देणारा प्रसंग. दोन जीवांना जोडणारा, दोन कुटुंबांना जोडणारा! म्हणून हा प्रसंग उत्सवासारखा साजरा केला जातो. तरीसुद्धा अनेकांना काडीमोड होण्याचे दुःख पचवावे लागते, पण का? लग्न जुळवताना शिक्षण, संपत्ती, कमाई, रूप, घर-दार, नातेवाईक या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. आयुष्य स्थिर स्थावर होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेच, मात्र त्या बरोबरीने जोडीदाराची निवड करताना कोणत्या मुख्य बाबी पहायला हव्या ते ही जाणून घेऊ.
लग्न का करतोय? याचे उत्तर वर-वधूला माहीत असणे गरजेचे आहे. केवळ वय झाले, इतरांची लग्न होतात, आपण मागे राहू, घरचे बळजबरी करतात म्हणून लग्न करणे योग्य नाही. त्या नात्याची, हक्काच्या व्यक्तीची गरज निर्माण व्हायला हवी, तरच ते नाते सर्वार्थाने जपले जाते. लग्न तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा दोघांची एकमेकांना साथ असते. दोघांची प्रगती होते आणि तेव्हाच कुटुंब आनंदी होते.
ज्याप्रमाणे दोन कंपन्या एकत्र आल्यावर त्यांच्या उत्पन्नात वाढ होते, त्याप्रमाणे दोन व्यक्ती एकत्र आल्यावर त्या दोघांची आपापल्या क्षेत्रात प्रगती होत असेल आणि दोघांचा आपल्या जोडीदाराला चांगला पाठिंबा असेल तर ते नाते टिकते, फुलते आणि वाढते.
लग्न ठरल्यापासून होईपर्यंतचा काळ फार छान असतो. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी काही गोष्टींची पारख करायला हवी. जसे की जोडीदाराच्या सान्निध्यात आपल्याला इतर चिंतांचा विसर पडतो का? त्याच्याबरोबर सुरक्षित भावना निर्माण होते का? आपल्या रागाचा निचरा होतो का? तणाव दूर होतो का? आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते का? लव्ह मॅरेज मध्ये सहवासातून या गोष्टी लक्षात येतात, पण अरेंज मॅरेज असेल तरीही समोरच्या व्यक्तीच्या स्वभावावरून या बाबी तपासता येतात.
याउलट होणाऱ्या जोडीदाराचे आयुष्य आधीच तणावग्रस्त असेल, स्वभाव तापट असेल, बोलण्या वागण्यात ताठरता असेल, समोरच्याचे ऐकून न घेण्याची मानसिकता असेल आणि संवाद अभाव असेल तर ते नाते फुलण्याआधीच कोमेजते. एक तर त्यावर बोलून तोडगा काढायला हवा, स्वभाव बदलायला हवा किंवा त्याची जाणीव समोरच्याला करून द्यावी. अन्यथा एकदा का नाते जोडले गेले की जोडीदाराचे दोषही गुण म्हणून स्वीकारावे लागतात.
लग्नावर होत असलेल्या विनोदामुळे त्याचे गांभीर्य कमी झाले आहे. मात्र आपण ते लक्षात घेतले आणि त्या नात्याची पहिल्या दिवसापासून मशागत केली तर ते हे नाते आनंद, विश्वास, पाठिंबा, संरक्षण, मैत्री असे पैलू उलगडून दाखवण्यास सक्षम होते. त्याला सुसंवादाचे खत पाणी घालत राहिले पाहिजे.