तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:46 PM 2024-05-02T14:46:22+5:30 2024-05-02T15:03:26+5:30
चैत्र महिना स्वामीभक्तांसाठी विशेष असल्याचे मानले जाते. स्वामींचे केवळ नामस्मरण चैतन्यदायी अन् आश्वासक ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मराठी नववर्षाचा पहिला चैत्र महिना अनेकार्थाने महत्त्वाचा आणि विशेष ठरतो. चैत्र नवरात्र, राम नवरात्र, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, अक्षय्य तृतीया यांसह अनेकविध महत्त्वाचे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दत्तावतार मानले गेलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी चैत्र महिना विशेष मानला जातो.
चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो. हा दिवस स्वामीभक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात. तर चैत्र महिन्याच्या वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांनी अवताराची सांगता केली होती. या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून त्यांची शिकवण, उपदेश, विचार यांचे आचरण करण्याचा संकल्प केला जातो. ०९ एप्रिल २०२४ रोजी स्वामींचा प्रकट दिन होता. तर आता ०६ मे २०२४ रोजी स्वामी समर्थांचा अवतारसमाप्ती दिन आहे.
स्वामी समर्थ महाराजांना मानणारा वर्ग मोठा आहे. कोट्यवधि भाविक स्वामींचे नामस्मरण, पूजन करत असतात. काही जण अगदी न चुकता नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहे, अशी भावना स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांमध्ये असल्याचे दिसून येते. संकटातून स्वामी मार्ग दाखवतील, नक्कीच बाहेर काढतील, अशी श्रद्धा स्वामी भक्त बाळगून असतात.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात, हे अगदी सर्वश्रुत आहे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली.
श्री स्वामी समर्थ दिव्य, तेज:पुंज होते. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे' हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ 'श्री स्वामी समर्थ' असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे.
षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे, असे सांगितले जाते. 'श्री स्वामी समर्थ' हाही सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते, असा अनुभव आहे.
श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास 'स्वाः + मी' अशी होते. स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. तर, समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा.
त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा. हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे.
स्वामी सान्निध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते. तर, भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपावर्षाव करत राहतील, असे सांगितले गेले आहे. स्वामी समर्थांनी सुखी जीवनाची काही वचने सांगितली आहेत. तर स्वामींचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो.
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. - जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. - आळशी माणसाचे तोंड पाहू नये. - शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. - जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. - भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. - आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा; राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल. - मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा. - हम गया नही जिंदा है.
निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे। अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।। जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।। खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त। कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात। हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।। - या स्वामींच्या तारक मंत्राचे हजारो घरात आवर्जून पारायण केले जाते.
असे हे दत्त स्वामी तत्त्व सर्व चराचर व्यापुनी उरले आहेत. स्वामींनी अनेक उत्तमोत्तम शिष्यगण घडवले आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक दिव्य पैलू आहेत. त्यातील अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजेच तेजस्वी शिष्यपरंपरा. यामध्ये बीडकर महाराज, शंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), नृसिंह सरस्वती (आळंदी), सीताराम महाराज (मंगळवेढे), साईबाबा (शिर्डी), देवमामलेदार (नाशिक), रांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), स्वामीसुत (मुंबई), बाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि गजानन महाराज (शेगांव) आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील.
या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते. कोणताही विधी न करता, स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे, जीवन्मुक्त करणे या दीक्षाप्रकाराला संकल्प दीक्षा असे म्हणतात. यातून स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचे मार्गदर्शन केले असे म्हटले जाते. गजानन महाराज आणि साईबाबा हे स्वामी समर्थांचे शिष्य असल्याचा उल्लेख स्वामी समर्थांशी निगडीत काही ग्रंथांत आल्याचे आढळून येते.