Ritual: लग्नकार्यात पाच मानाच्या आमंत्रणांमध्ये पितरांनाही दिला जातो मान; का आणि कसा? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:27 IST2025-03-10T16:13:03+5:302025-03-10T16:27:40+5:30

Wedding Ritual:सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे काही जण लग्न पत्रिकेची सॉफ्ट कॉपी बनवून ती मित्र परिवारात फॉरवर्ड करून मोकळे होतात. मात्र देवाला ठेवण्यासाठी काही पत्रिका छापून घ्याव्याच लागतात. एवढेच नाही तर पत्रिका वाटप करण्याआधी लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून पाच देवतांना प्रार्थना केली जाते. असे ज्योतिष शास्त्र सांगते!

विवाह सोहळा आणि कुटुंब व्यवस्था या दोन्ही गोष्टींना आपल्याकडे अतिशय महत्त्व असते. लग्न छोटेखानी असो नाहीतर शाही, ते रीती रिवाजासकट पार पडावे, देवाब्राह्मणाच्या साक्षीने व्हावे, घरच्यांच्या आशीर्वादाने व्हावे अशी प्रत्येक वर, वधूची अपेक्षा असते. त्यासाठी विवाह पत्रिका छापून अगत्याचे आमंत्रणही दिले जाते.

लग्न पत्रिकेत सगळा मजकूर छापूनही प्रत्यक्ष भेटीत आपण वर, वधूचे नाव, तारीख, वार, मुहूर्त याची तोंडपाठ माहिती देऊन आग्रहाने बोलावणे करतो. केवळ लोकांनाच नाही तर देवाला सुद्धा! शास्त्रानुसार देवाला पत्रिका ठेवतानाही हळद, कुंकू, अक्षता वाहून पत्रिकेचे वाचन करायचे असते. देवाला शुभकार्यकाला बोलवायचे असते आणि शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशी प्रार्थनाही करायची असते. पण केवळ गणपतीलाच नाही तर अन्य चार देवतांनाही!

सर्व कार्याच्या शुभारंभी गणरायाचे पूजन अनिवार्य ठरते. लग्न कार्यातही गणपतीला पहिली पत्रिका अर्पण करून आप्त स्वकीयांना लग्नाचे बोलावणे केले जाते. गणपती बाप्पा जसा सुखकर्ता आहे तसा दुःखहर्तादेखील आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे लग्न समारंभात कोणत्याही प्रकारचे अरिष्ट येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणरायला लग्न पत्रिका देऊन आमंत्रण केले जाते.

वधू वराला लग्नाच्या दिवशी लक्ष्मी नारायणाचा जोडा असेच संबोधले जाते. त्याचे मूळ रूप म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी! संसाराला सुरुवात करण्याआधी या विश्वाचा संसार सांभाळणाऱ्या विष्णू आणि लक्ष्मीलाही पत्रिका अर्पण करून अगत्याने येऊन आशीर्वाद द्यावा असे विनवले जाते.

स्वतः आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेले हनुमंत मुलींचे लवकर लग्न ठरावे म्हणून नेहमी आशीर्वाद देतात. शिवाय हनुमंत चिरंजीवी असल्याने संकटकाळी त्यांचे नाव घेतले तरी ते मदतीला येतात अशी त्यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. म्हणून लग्न कार्यातील अडचणी दूर ठेवण्यासाठी हनुमंतालाही आमंत्रण दिले जाते.

आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणारे आपले कुलदैवत आणि कुलदेवी यांनाही शुभ कार्याचे आमंत्रण दिले जाते. त्यांच्या आशीर्वादाने वंशाची वृद्धी होत राहो अशी प्रार्थानाही त्यानिमित्ताने केली जाते.

हो! पितरांनाही लग्न पत्रिका ठेवली जाते. नव्हे तर हा त्यांचा मान असतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुळात सुख, संपत्ती यावी, समाधानी आयुष्य जगता यावे म्हणून शुभ कार्यात आठवणीने त्यांनाही बोलावणे केले जाते. पण त्यासाठी पितरांना गाठायचे तरी कुठे? तर पिंपळाच्या झाडाखाली! शनी तथा हनुमान मंदिराच्या परिसरात असणाऱ्या पिंपळ पारावर पितरांसाठी पत्रिका ठेवावी आणि त्यांनीही वधू वराला आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना करावी!