Sade Sati: 'ही' सहा कामे करणाऱ्या लोकांना आयुष्यात साडेसातीचा त्रास कधीच होत नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:54 AM 2022-07-16T11:54:17+5:30 2022-07-16T12:10:16+5:30
Sade Sati: साडेसाती या विचारानेही लोकांचा थरकाप उडतो. पण म्हणतात ना, कर नाही त्याला डर कशाला? जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुमच्याशी काही वाईट घडेलच कशाला? शनी ही न्याय देवता आहे. त्यांच्या ठिकाणी आपपरभाव नाहीच! साडेसातीच्या वर्षात शनी देव आपण केलेल्या कर्माचे फळ द्यायला येतात. ज्यांनी कष्ट घेतले त्यांचा उत्कर्ष, ज्यांनी दुसऱ्यांना त्रास दिला त्यांना कष्ट! साडेसाती आली की लगेच घाबरणे, उठ सुठ कारण नसताना भयभीत होऊन ह्या ज्योतिषाला त्या ज्योतिषाला पत्रिका दाखवत फिरणे हे अस्थिर मनाचे आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास नसण्याचे चिन्ह आहे. साडेसाती येऊदे नाहीतर शनी राशीपरीवर्तन करुदे आपले जीवन चालूच राहणार आहे. यासाठी आपल्या कर्माला अध्यात्माची जोड असली तर उत्तम. आपले कर्म जितके शुद्ध,सात्विक असेल तितके शनीमहाराज अधिकाधिक प्रसन्न होतील.
ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित सांगतात, कायेने,वाचेने आणि मनाने सुद्धा कुणालाही दुखवू नये. हा धडा गिरवला तर आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील. एखादा वसा घ्यावा पण तो आयुष्यभर निभवावा. श्री गजानन विजय ग्रंथाचे नियमित वाचन , गुरुचरित्र , साई चरित्र , सप्तशती , गुरूलीलामृत , गीतेचे नियमित पठाण ,नामस्मरण ह्या गोष्टी आयुष्य सुसह्य करतात, निर्णयक्षम बनवतात आणि सन्मार्गाने जगायला शिकवतात. या उपासनेला गरज आहे सत्कर्माची, ते पाहूनच शनिदेव आपल्याला यथोचित फळ देतात.
आपले काम चोख करणे : शनिदेवाला कर्तव्य निष्ठ लोक आवडतात. ज्याला जे काम सोपवले आहे, त्या कामात कुचराई नको. दुकानातले सीसीटीव्ही जसे आपल्यावर पाळत ठेवतात, तसे शनी देव आपल्या कर्मावर पाळत ठेवतात आणि जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ देतात. म्हणून आपले कर्म आपण प्रामाणिकपणे पार पाडणे शनी देवाला अभिप्रेत असते.
वडीलधाऱ्यांचा सन्मान : आज ना उद्या आपणही वृद्धापकाळ अनुभवणार आहोत, हे लक्षात घेता आता जे वृद्धावस्थेत आहेत अशा लोकांचा सन्मान करणे, काळजी घेणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे हे आपले कर्तव्य आहे. आपण जे वागतो त्याचं निरीक्षण पुढची पिढी करत असते. त्यामुळे जी वागणूक आपण वडीलधाऱ्या मंडळींना आज देत आहोत, भविष्यात त्याचीच परतफेड पुढच्या पिढीकडून आपल्याला होणार आहे हे ध्यानात ठेवा.
कोणालाही दुखवू नका: वर म्हटल्याप्रमाणे कायेने, वाचेने आणि मनाने कोणालाही दुखवू नका. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन करू नका. तो वेळ स्वतःला घडवण्यात कामी लावा, म्हणजे इतरांची उणी दुणी काढायला वेळ मिळणारच नाही. एकवेळ शस्त्राचे घाव भरले जातील, पण शब्दांनी मनावर केलेले घाव भरून निघत नाहीत. म्हणून एकवेळ कमी बोला, पण चांगलं बोला आणि चांगलं वागा.
स्वच्छ चारित्र्य: ज्याप्रमाणे आपण तिकीट काढलेले असेल तर स्टेशनवर टीसी दिसला तरी आपल्याला भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे आपले कर्म चांगले असेल तर शनी देव आपल्या राशीला आले काय किंवा साडेसाती सुरू झाली काय, आपल्याला घाबरण्याचे कारणच उरणार नाही. हा आत्मविश्वास कमावण्यासाठी चारित्र्य नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे लागते.
व्यसनांपासून दूर: व्यसनाधीन मनुष्य स्वतःसकट दुसऱ्यांचे आयुष्य मातीमोल करतो, असा आजवरचा इतिहास आहे. इतरांच्या संसाराची झालेली वाताहत पाहूनही मनुष्य सुधारत नाही, हे दुर्दैव आहे! वेळीच सावध होऊन जो मनुष्य स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवतो, तोच सन्मार्गावर चालतो. व्यसन म्हणजे केवळ नशापाणी नाही, तर एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे हेसुद्धा व्यसनच आहे. अशा गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवणे ही देखील व्यसनमुक्तीच आहे.
प्रामाणिकपणा : हा अत्यंत दुर्मिळ होत जाणारा गुण आहे. दुसऱ्यांसमोर प्रामाणिक राहणे हा खोटेपणा आहे पण स्वतःशी प्रामाणिक राहणे हा खरेपणा आहे. कोणी आपली दखल घ्यावी म्हणून प्रामाणिकपणे काम न करता आपण स्वतःच्या कर्माला जवाबदार आहोत ही जाणीव ठेवून कर्म करत राहिलो तर त्याला प्रामाणिकपणा म्हणता येईल!
प्रारब्ध भोग हे भोगूनच संपवायचे असतात. अनेक जन्माच्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन आपली याही जन्मात वाटचाल सुरूच असते. त्यात ह्या जन्मातील पाप पुण्याची भर पडत असते. म्हणून प्रामाणिक राहा, प्रयत्न करत राहा आणि कोणालाही दुखवू नका, मग साडेसातीची आणि शनी देवांची भीती कदापि वाटणार नाही!