Safala Ekadashi 2022: सफला एकादशीनिमित्त करूया विष्णूंच्या सुदर्शन चक्राचे स्मरण, दूर होईल संकट आणि मिळेल नवजीवन! By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:46 PM 2022-12-19T13:46:40+5:30 2022-12-19T14:06:52+5:30
Safala Ekadashi 2022: हिंदू धर्मातील त्रिदेव महाशक्तीशाली समजले जातात. त्या तिघांनी आपले काम वाटून घेतले आहे. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता, विष्णू पालनकर्ता आणि शंकर संहारक. तिन्ही देवांकडे शक्तिशाली शस्त्र आहेत. ब्रह्मदेवाकडे ब्रह्मास्त्र, महादेवाकडे त्रिशूल आहे आणि विष्णूंच्या बोटात सुदर्शन चक्र आहे. भगवान विष्णूंनी कृष्णावतारात सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला. आज सफला एकादशीनिमित्त जाणून घेऊया सुदर्शन चक्राची विस्तृत माहिती. सुदर्शन चक्र अतिशय प्रभावी आणि गतिमान असते. त्या चक्राने आजवर अनेक दैत्यांचा दारुण पराभव केला. हे शस्त्र भगवान विष्णू वगळता अन्य कोणा देवतेच्या हाती नसते. त्याच्या निर्मितीच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी काही बाबी जाणून घेऊया.
देवतांची सृष्टी निर्माते विश्वकर्मा यांनी सुदर्शन चक्राची निर्मिती केली केली अशीही एक कथा आहे. विश्वकर्माची कन्येचा विवाह सूर्याशी झाला. पण सूर्याच्या तेजामुळे ती त्याच्या जवळ जाऊ शकली नाही. याबाबत तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर विश्वकर्माने सूर्याचे तेज कमी केले. आणि उरलेल्या तेजातून विश्वकर्माने तीन गोष्टी बनवल्या. पहिले पुष्पक विमान, दुसरे भगवान शिवाचे त्रिशूल आणि तिसरे सुदर्शन चक्र.
एका पौराणिक कथेत असेही वर्णन आढळते की एकदा असुरांनी स्वर्गावर हल्ला केला आणि देवतांना कैद केले. भगवान विष्णूही त्याचे रक्षण करू शकले नाहीत. त्यांनी भगवान शंकरांना संकट निवारणासाठी प्रार्थना करत १००० कमळ पुष्प समर्पित करणार असा संकल्प सोडला. शंकर प्रसन्न झाले पण एक कमळ गहाळ केले. त्यामुळे विष्णूंचा संकल्प अर्धवट राहिला. त्यावेळी त्यांनी आपला कमलसदृश नेत्र शंकराला अर्पण केला. शंकर खुश झाले आणि त्यांनी विष्णूंना सुदर्शन चक्र भेट दिले त्यामुळे विष्णूंचा विजय झाला.
महाभारतानुसार, भगवान कृष्ण आणि अर्जुन यांनी खांडव वन जाळण्यात अग्नी देवाला मदत केली होती. त्या बदल्यात त्यांनी कृष्णाला सुदर्शन चक्र आणि गदा भेट दिली. तसेच परशुरामाने भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र दिले होते असेही म्हटले जाते.
सुदर्शन चक्राचे वैशिष्ट्य असे की ते शत्रूचा पराभव करूनच परत येते. त्यापासून पळ काढण्यासाठी संपूर्ण पृथ्वीवर जागा नाही. पौराणिक कथेनुसार ते एका सेकंदात लाखो वेळा फिरते.
हे एक गोलाकार शस्त्र आहे, ज्याचा व्यास सुमारे १२-३० सेमी असते. सुदर्शन चक्राला धारदार किनार असते. असे मानले जाते की हे ब्रह्मास्त्रापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली शस्त्र आहे. आज सफला एकादशीच्या निमित्ताने विष्णूंच्या या प्रभावी शस्त्राला नमन करूया आणि आपल्या कार्याच्या आड येणाऱ्या संकटाचा सुदर्शन चक्राने खात्मा करावा अशी प्रार्थना करूया.