Shani Ast 2023: ०४ फेब्रुवारीला शनी अस्तंगत: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? पुढील ३१ दिवस महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:07 AM2023-01-31T07:07:07+5:302023-01-31T07:07:07+5:30

Shani Ast 2023: शनी स्वराशीत अस्तंगत होत असून, काही राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रतिकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

Shani Ast 2023: जानेवारी महिन्यात शनी ग्रहाने आपले स्वामित्व असलेल्या मकर राशीतून स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला. यानंतर लगेचच अवघ्या १८ दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अस्तंगत होत आहे. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. शनीचा अस्त सुमारे महिनाभर चालणार आहे. ०६ मार्च रोजी अस्त असलेल्या शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे.

आताच्या घडीला सूर्य मकर राशीत आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असतील. सूर्याच्या प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. यालाच शनी अस्त असे म्हटले जाते. मार्च महिन्यात शनी सूर्यापासून लांबच्या अंशांवर जाईल. त्यामुळे ४ फेब्रुवारी २०२३ ते ०६ मार्च या कालावधीत शनी अस्तंगत राहील.

शनी अस्तंगत होणे विशेष मानले जात आहे. याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येऊ शकेल. काही राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवनात तसेच आरोग्यामध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. ३१ दिवस शनी अस्तंगत असणार आहे. तुमच्या राशीवरील प्रभाव जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. प्रियजन आणि नातेवाईकांकडून काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांना प्रकल्प मिळणे कठीण होऊ शकते. नोकरदार सहकारी आणि अधिकारी यांच्यामुळे अडचणी येऊ शकतात. मात्र, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. नफा कमविण्यासाठी कठोर परिश्रम कराल, परंतु फळ फार चांगले मिळेलच असे नाही. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागू शकेल. मात्र, घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. मित्रांसोबतच्या भेटीमुळे काही समस्या दूर होऊ शकतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. कामाचा ताण जास्त असेल. नोकरदारांनी अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे वादात पडू नये. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेलच असे नाही. प्रवासादरम्यान काही अडथळ्यांनाही सामोरे जावे लागू शकते. मेहनत करत राहावे.

कर्क राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी वादापासून दूर राहावे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. सासरच्या मंडळींकडून काहीसा त्रास संभवू शकतो. मात्र, भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल.

सिंह राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ काहीसा समस्याकारक ठरू शकेल. व्यवसायातील भागीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. गैरसमजामुळे जोडीदाराशी मतभेद संभवतात. मात्र, जीवनसाथीच्या मदतीने आर्थिक लाभ मिळू शकेल. अडचणींना खंबीरपणे सामोरे जाण्याची हिंमत मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची आणि हितशत्रूंची काळजी घ्यावी लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मेहनतीनुसार परिणाम प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांना कार्यक्षमतेत घट दिसून येऊ शकेल. सहकारी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. कौटुंबिक, आर्थिक आणि कामाच्या ठिकाणी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी.

तूळ राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. तुमच्या मुलांच्या आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. वादविवादापासून दूर राहावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील सहकारी तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. आई-वडिलांसोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा.

धनु राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ वरदानासारखा ठरू शकेल. नफा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. स्पर्धेला खंबीरपणे सामोरे जावे लागेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखाल. कामाच्या ठिकाणचे वातावरण अनुकूल राहील.

मकर राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. तुमची कामे करत राहा. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. दुसरीकडे, कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. नोकरदारांनी बोलताना वाणीवर ताबा ठेवावा. मित्रांपासून गुप्त गोष्टी लपवून ठेवाव्या लागतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. याच राशीत शनी अस्त होत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. नोकरदारांवर कामाचा ताण पडेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मात्र, विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतील.

मीन राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगत काळ संमिश्र ठरू शकेल. मीन राशीची साडेसाती सुरु झाली आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. जास्त प्रवास टाळा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आपले काम करत राहावे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आराम मिळेल. वादांपासून दूर राहा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.