शनी मकरेत मार्गी: ‘या’ ६ राशींना शुभ-लाभ, सर्वोत्तम काळ; कोण साडेसाती मुक्त होणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 09:24 AM2022-10-23T09:24:32+5:302022-10-23T09:32:18+5:30

जानेवारी २०२३ पर्यंत साडेसाती स्थितीत कोणता बदल होईल? शनी मार्गी होण्याचा तुमच्यावरील प्रभाव कसा असेल? पाहा, डिटेल्स...

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह २३ ऑक्टोबर रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या स्वराशीत म्हणजेच मकर राशीत मार्गी होत आहे. शनी जुलै २०२२ रोजी शनी वक्री चलनाने कुंभ राशीतून मकर राशीत विराजमान झाला होता. जानेवारी २०२३ मध्ये शनी मकर राशीतून पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (saturn direct in capricorn october 2022)

ऐन दिवाळी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी शनी मार्गी होत आहे. शनी हा क्रूर ग्रह असला तरी कर्मकारक आहे. जसे ज्याचे कर्म, तशी फळे त्या त्या व्यक्तीला मिळतात, अशी मान्यता आहे. याचा काही राशीच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव दिसून येईल असे सांगितले जात आहे. तुमच्यावर शनीचा प्रभाव कसा असेल? कोणत्या राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल? कोणत्या राशींवर साडेसातीचा प्रभाव दिसून येईल? जाणून घेऊया... (shani margi in makar rashi 2022)

मेष राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे चांगले ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने अनुकूल परिणाम देईल. जुन्या रखडलेल्या योजनांमध्ये पुन्हा काम सुरू होईल. करिअरमध्ये स्थैर्य येईल. भागीदारीच्या व्यवसायातही तुम्हाला विशेष लाभ मिळेल. घरगुती बाबींमध्ये काही अडथळे येऊ शकतात. शक्य असल्यास दररोज हनुमान चालिसाचा पठण करणे उपयुक्त ठरू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला भाग्य कमी मिळेल. कामात अडथळे येऊ शकतात. तुमच्या खर्चात भर पडू शकेल. व्यावसायिकांचा नफा कमी होऊ शकेल. घरगुती आणि आर्थिक समस्यांमुळे तुम्ही खूप अस्वस्थ असाल. शक्य असल्यास शनिवारी शनि मंत्रांचा जप करावा.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. काही समस्या आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आळस झटकून कामाला लागावे. रोज सकाळी फिरायला जाणे उपयुक्त ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर तु्म्हाला फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. वैयक्तिक जीवनात सासरच्या लोकांशी संबंध बिघडू शकतात. शनिवारी मंदिरात काळे तीळ दान करावे.

कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. व्यावसायिक लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतील. काही आर्थिक नुकसान होऊ शकते. याचा नकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर होऊ देऊ नका.

सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे शुभ ठरू शकेल. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुकूलता असेल. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक बातमी मिळू शकेल. करिअरच्या बाबतीतही तुम्हाला शुभ प्रभाव पाहायला मिळतील. तुम्हाला कुटुंबात तुमच्या जोडीदारासोबत वादाला सामोरे जावे लागू शकते. शक्य असल्यास अन्नदान करावे.

कन्या राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे संमिश्र ठरू शकते. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. नियोजित योजनांमध्येही अडथळे आणि समस्या निर्माण होऊ शकतात. नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने यावेळी सतर्क राहणे आवश्यक आहे. बजेटमध्ये राहून तुम्ही तुमचा खर्च करावा.

तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे सुखकारक मानले जात आहे. भौतिक सुखाचा आनंद घेऊ शकाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमचे आईसोबत काही वाद होऊ शकतात. प्रेमात असलेल्या व्यक्तींनाही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल. तुमच्या करिअरमध्ये काही विशेष लाभ होऊ शकतात. तुमचे उत्पन्नही लक्षणीय वाढू शकते. तुमच्या भावंडांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कुटुंबात आनंद राहील. वादापासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. शक्य असल्यास दर शनिवारी हनुमानजींना लाडू अर्पण करावे.

धनु राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे शुभ ठरू शकेल. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीचीही काळजी घ्या. कोणाशीही खोटे बोलू नका. शक्य असल्यास दररोज शनी मंत्राचा सायंकाळी १०८ वेळा जप करावा.

मकर राशीतच शनी मार्गी होत आहे. शनी मकर राशीचा स्वामी आहे. मकर राशीची साडेसाती सुरू आहे. या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. तुमच्या मनात अनेक प्रकारच्या चिंता येऊ शकतात. व्यवसायात एकामागून एक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्चही वाढू शकतो. तुमचा गोंधळ वाढेल. आपल्या लहान भावंडांच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. तुमचे पैसे खर्च जास्त होऊ शकतील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. तुम्हाला परदेश प्रवासाचे योग येतील. मात्र, या प्रवासात तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात.

मीन राशीच्या व्यक्तींना शनीचे मार्गी होणे शुभ ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शनीदेवाच्या कृपेने प्रेमात स्थिरता येईल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रगती करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असून स्पर्धात्मक परीक्षांतून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मेहनतीचे फायदे मिळतील. शक्य असल्यास गरजूंना उपयोगी वस्तू दान करा.

जुलै २०२२ रोजी शनीने वक्री मार्गाने मकर राशीत प्रवेश केल्यावर धनु राशीच्या व्यक्तींवर पुन्हा एकदा साडेसातीचा प्रभाव सुरू झाला आणि मीन राशीवरील साडेसातीचा प्रभाव अत्यल्प झाला. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी शनी मकरेत मार्गी होत आहे. तेव्हा साडेसाती चक्रात कोणताही बदल होणार नाही. मात्र, जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. तेव्हा धनु राशीची साडेसाती संपुष्टात येईल आणि मीन राशीची साडेसाती पुन्हा सुरू होईल. तर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल आणि कुंभ राशीचा साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.