Saturn Retrograde 2022: ५ जूनला शनी वक्री: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा; उत्तम फायदेशीर काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:56 AM2022-06-04T07:56:15+5:302022-06-04T08:00:50+5:30

Saturn Retrograde 2022: शनी वक्री होणे ही महत्त्वाची घटना मानली जात असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्याचा उत्तम लाभ मिळू शकेल? पाहा...

जून महिना ज्योतिषीय दृष्टिने महत्त्वाचा मानला जात असून, या महिन्यात ५ महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेला बुध ग्रह महिन्याच्या सुरुवातीलाच वृषभ राशीत मार्गी झाला. (saturn retrograde aquarius 2022)

बुधनंतर आता नवग्रहांमधील न्यायाधीश मानला गेलेला कर्मकारक शनी ग्रह कुंभ राशीत वक्री होत आहे. जून महिन्यातील सर्वांत महत्त्वाचा हा बदल मानला जात आहे. शनी वक्री झाल्याचा मोठा परिणाम केवळ राशींवर नाही, तर देशासह जगावरही पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जाते. (shani vakri in kumbh rashi 2022)

आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरू आहे. शनी कुंभ राशीत वक्री होण्याचा प्रभाव सर्व राशींवर पडू शकेल. काही राशींना याचा प्रतिकूल प्रभाव जाणवू शकतो. जन्म कुंडलीत शनी कोणत्या स्थानी आहे, यालाही महत्त्व असल्याचे मानले जाते.

शनी वक्री होण्याचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी वक्री आहे, त्या राशीच्या व्यक्तींना आगामी कालावधीत शुभ ठरू शकेल, असे मान्यता आहे. मात्र, शनीच्या कुंभ राशीत वक्री होण्याचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकेल, ते जाणून घेऊया...

शनी वक्री होणे मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीकारक ठरू शकते. कार्यक्षेत्रात यशाच्या नव्या शिखरावर पोहोचण्याची संधी प्राप्त होऊ शकते. स्थानबदल फायद्याचे ठरू शकेल. सामाजिक स्तरावर तसेच मित्रांसोबत चांगला वेळ व्यक्तीत करू शकाल. भावंडांकडून चांगले सहकार्य लाभेल. मात्र, वादविवादात पडू नये तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला दिला जात आहे.

शनी वक्री होणे वृषभ राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकते. सरकारी नोकरदार व्यक्तींना उत्तम लाभाचा काळ ठरू शकेल. ऑटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना आर्थिक प्रगतीचा कालावधी ठरू शकेल. पदोन्नती, वेतनवृद्धी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या समर्थकांची संख्या वाढू शकेल. समाजात मान-सन्मान वृद्धिंगत होऊ शकेल. अध्यात्माची आवड वाढू शकेल.

शनी वक्री होणे मिथुन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कार्यक्षेत्रात कौतुक केले जाऊ शकेल. नोकरदार वर्गाला भाग्याची आणि नशिबाची उत्तम साथ मिळू शकेल. सुखद अनुभव घेऊ शकाल. सासरच्या मंडळींकडून लाभ संभवतो. नवीन गोष्टी शिकण्याकडे जास्त कल राहू शकेल.

शनी वक्री होणे कन्या राशीच्या व्यक्तींना यशकारक ठरू शकते. व्यवसाय, व्यापारी वर्गाला प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मिळकत वाढू शकेल. मान-सन्मान, प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकेल. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकेल. धनसंचयाच्या योजना मार्गी लागू शकतील. मुलांच्या प्रगतीने आनंदी व्हाल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहू शकेल. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे चांगले सहकार्य लाभेल.

अलीकडेच धनु राशीच्या व्यक्तींची साडेसातीतून सुटका झाली आहे. शनी वक्री होणे या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. आगामी कालावधीत सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतील. समस्यांचे निराकारण होऊ शकेल. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यापारी वर्गावर ग्राहक खुश असेल. तार्किक क्षमता वाढीस लागू शकेल.