Shani Amavasya 2023: ‘या’ ५ राशींवर शनी अमावास्येला प्रतिकूल प्रभाव; शनीदेवाचे ५ उपाय करा, चिंतामुक्त व्हा! By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 05:04 PM 2023-01-20T17:04:06+5:30 2023-01-20T17:10:56+5:30
Shani Amavasya 2023: सन २०२३ ची पहिली शनी अमावास्या असून, या दिवशी शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. सन २०२३ मधील पहिली अमावास्या शनिवारी आहे. पौष अमावास्या शनिवारी येत असल्यामुळे ही अमावास्या शनी अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. तसेच या अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हटले जाते. शनिवार हा शनीदेवाचा वार मानला जातो. या वारावर शनीचा प्रभाव अधिक असतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (Shani Amavasya 2023)
१७ जानेवारी रोजी शनीचे स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि लगेचच २१ जानेवारी रोजी शनी अमावास्या लागत आहे. हा एक विशेष योग मानला जात आहे. यामुळे काही राशीच्या व्यक्तींवर शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे.
शनिवार, २१ जानेवारी २०२३ रोजी पौष अमावास्या आहे. पौष महिन्यातील अमावास्या २१ तारखेला सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि याच दिवशी उत्तररात्रौ ०२ वाजून २३ मिनिटांनी संपेल. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर साडेसाती चक्र बदलले आहे. मीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरू झाली आहे.
शनी अमावास्येचा काही राशींना प्रतिकूल प्रभावाचा सामना करावा लागू शकेल. काही समस्या, अडचणींना सामोरे जावे लागू शकेल, असे सांगितले जात असून, शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावेत, कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...
मेष राशीच्या व्यक्तींना शनी अमावास्या काहीशी संमिश्र ठरू शकेल. मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. या राशीच्या व्यक्तींनी शनी अमावस्येला सूर्यास्तानंतर शनीदेवाची पूजा करावी. शनी मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करावे. असे करणे विशेष फायदेशीर ठरू शकेल.
सिंह राशीच्या व्यक्तींना शनी अमावास्या काहीशी संमिश्र ठरू शकेल. भावंडांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या, घरगुती चिंता आणि व्यवसायाशी संबंधित गुंतागुंत अशा गोष्टींना सामोरे जावे लागू शकेल. शनीचा प्रभाव काहीसा कमी करू शकता, यासाठी शनी अमावस्येला काही सोपे उपाय केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकेल. या राशीच्या व्यक्तींनी शनी अमावस्येच्या दिवशी सुंदरकांड पठण करा किंवा श्रवण करावे.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी अमावास्या काहीशी संमिश्र ठरू शकेल. तसेच वृश्चिक राशीवर शनीचा ढिय्या प्रभावही असणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबात कलहाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायाशी संबंधित गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. शनी अमावस्येला काही सोपे उपाय करून तुम्हीही शनीच्या प्रकोपापासून दिलासा मिळवू शकता. या राशीच्या व्यक्तींना शनीशी संबंधित गोष्टींचे दान करावे.
धनु राशीच्या व्यक्तींना शनी अमावास्या काहीशी संमिश्र ठरू शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशाने धनु राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे. मात्र, तुमचा खर्च जास्त होणार आहे. मर्यादित उत्पन्नामुळे तुम्ही तणावात राहाल. तुम्हाला काम आणि व्यवसायात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत शनी अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय करावेत. या राशीच्या व्यक्तींनी शनि अमावस्येपासून दर शनिवारी शनी बीज मंत्राचा जप करावा.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनी अमावास्या काहीशी संमिश्र ठरू शकेल. शनीच्या कुंभ प्रवेशानंतर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. कामात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. धनलाभ आणि प्रगतीसाठी विशेष संघर्ष करावा लागू शकतो. मन अस्वस्थ राहील. या राशीच्या व्यक्तींनी शनीदेवाचे पूजन, नामस्मरण करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.