शनीचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ५ राशींना शानदार, ७ महिने अनेकविध लाभ; संधींचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 12:53 PM2023-03-05T12:53:21+5:302023-03-05T13:05:16+5:30

शनीचा होत असलेला नक्षत्रबदल महत्त्वाचा मानला जात असून, त्याचा काही राशींवर शुभ प्रभाव दिसू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र बदलत असतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या या गोचराचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर मानवी जीवनासह देश-दुनियेवर पाहायला मिळतो. ग्रह राशींसह नक्षत्र बदलही करत असतात. आपल्याकडे नक्षत्र आणि त्यातील ग्रहांच्या स्थितीला अतिशय महत्त्व आहे.

नक्षत्र बदलाचाही प्रभाव पडत असल्याचे सांगितले जाते. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनीचा उदय झाल्यानंतर १५ मार्च रोजी शततारका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. या नक्षत्रात शनी १७ ऑक्टोबरपर्यंत विराजमान असणार आहे. शनीचे राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रातील गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे.

आताच्या घडीला शनी कुंभ राशीत आहे. शनी मंदगतीचा ग्रह आहे. शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणात पुढील ७ महिन्यांपर्यंत शनी विराजमान असणार आहे. शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा स्वामी गुरु आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख-समाधान उत्तमरित्या प्राप्त होते, असे म्हटले जाते.

शनीच्या या नक्षत्रबदलाचा शुभ प्रभाव ५ राशींवर असू शकेल, असे सांगितले जात आहे. या राशींना आगामी ७ महिन्यापर्यंत चांगल्या संधी, लाभ मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. राहु-गुरु-शनी हे तीन ग्रहांचा प्रभाव यामुळे दिसू शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका नक्षत्रातील प्रवेश चांगला मानला जात आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नवीन योजनेवर काम सुरू करू शकता. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक राहू शकेल. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासोबतच धनलाभही होऊ शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका नक्षत्रातील प्रवेश अनुकूल ठरू शकेल. ढिय्या प्रभावामुळे सुरू असलेल्या संघर्षातून काहीसा दिलासा मिळून त्याचे शुभ फळ शनी देऊ शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवास यशस्वी आणि उद्देशपूर्ण होऊ शकतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा शततारका नक्षत्रात होणारा प्रवेश शुभ मानला गेला आहे. करिअरच्या दृष्टीने आगामी काळ शुभ घटनांचा ठरु शकेल. यश आणि प्रगती साध्य करता येऊ शकेल. नोकरदारांच्या बदलीचे योग आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबतीतही हा काळ लाभाचा ठरू शकेल. खूप फायदा होऊ शकतो.

तूळ राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका नक्षत्रात होणारा प्रवेश चांगला ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने चांगला काळ ठरू शकेल. आनंददायी आणि अनुकूल परिणाम मिळतील. फायद्यासाठी कोणत्याही चुकीच्या कामाचा अवलंब करणे टाळावे. शनी न्यायाची देवता आहे. चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्यास लाभ न मिळता नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना खूप फलदायी ठरेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा शततारका नक्षत्रात होणारा प्रवेश यशकारक ठरू शकेल. अनेकविध बाबतीत यश मिळू शकेल. भरीव नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकेल. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नही वाढू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.