Shani Jayanti 2023: शनी जयंतीला 'या' गोष्टींचे दान करा आणि महापुण्य कमवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 02:41 PM2023-05-17T14:41:29+5:302023-05-17T14:45:41+5:30

Shani Jayanti 2023: ज्योतिष शास्त्रात शनी हा ग्रह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एवढेच नाही तर त्याच्या जयंतीचा दिवसही साजरा केला जातो. हिंदू धर्मातही शनि जयंतीला खूप महत्त्व आहे. दरवर्षी वैशाख अमावास्येला शनि जयंती साजरी केली जाते. यंदा १९ मे रोजी शनी जयंती आहे. या दिवशी सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव याचा जन्म झाला असे मानले जाते. शनिदेवाला न्याय देवता म्हटले जाते. शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात. तसेच सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव कृपा करतात. म्हणून शनी जयंतीचे औचित्य साधून दान धर्म करावा असे ज्योतिष शास्त्राने सुचवले आहे. जेणेकरून पुण्यप्राप्ती तर होईलच शिवाय कुंडलीतील शनी दोषातूनही मुक्तता मिळेल. यासाठी शनि जयंतीला पुढील वस्तूंचे दान करा

शनि जयंतीला काळे तीळ दान करणे शुभ मानले जाते. काळ्या तिळाचा लाडू, वडी सुद्धा दान करता येऊ शकते. त्यामुळे या दिवशी काळ्या तीळाचे दान करावे. याशिवाय वाहत्या स्वच्छ पाण्यात काळे तीळ सोडावेत. यामुळे साडेसाती असणाऱ्या जातकांना तसेच शनी प्रभाव असणाऱ्या राशींना शनी प्रकोपापासून दिलासा मिळतो.

शनि जयंतीच्या दिवशी उडीद डाळ दान करणे देखील शुभ मानले जाते. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी दीड किलो काळी उडीद डाळ एखाद्या गरजूला दान करावी. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे.

शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करण्याबरोबरच गरजवंताला तेलाचे दानही करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

माता पित्याची तसेच ज्येष्ठांची केलेली सेवा शनी देवाला विशेष आवडते. म्हणून शनी जयंतीच्या दिवशी गरजू ज्येष्ठ व्यक्तींना दान म्हणून काळी छत्री, रेनकोट, चपला किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेला यथाशक्ती आर्थिक मदत जरूर करावी. शनी कृपेच्या प्राप्तीसाठी त्याचा नक्की उपयोग होतो.