३० दिवस महत्त्वाचे! शनी-मंगळ षडाष्टक योग: ४ राशींना प्रतिकूल, संमिश्र काळ; अखंड सावध असावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 11:15 AM2023-06-01T11:15:51+5:302023-06-01T11:23:31+5:30

शनी आणि मंगळ एकमेकांचे शत्रू ग्रह असून, प्रतिकूल षडाष्टक योगाचा कोणत्या राशींना समस्याकारक ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. आताच्या घडीला मंगळ हा कर्क राशीत असून, शनी कुंभ राशीत आहे. कर्क रास ही मंगळाची नीच रास आहे. तर कुंभ राशीचा स्वामी शनी आहे.

कर्क राशीत प्रवेशानंतर मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग प्रतिकूल मानला गेला आहे. ३० जूनपर्यंत हा षडाष्टक योग जुळून येत आहे. ३० जूननंतर मंगळ कर्क राशीतून सिंह राशीत विराजमान होईल. त्यानंतर या योगाची सांगता होऊ शकेल.

शनी कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. मकर राशीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीचा दुसरा टप्पा आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी आणि मंगळाच्या षडाष्टक योगाचा कुंभ राशीसह अन्य काही राशींवर प्रतिकूल प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.

शनी आणि मंगळ षडाष्टक योगामध्ये कोणत्या राशींना समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकेल? कोणत्या राशींसाठी हा प्रतिकूल काळ असेल? काय सावधगिरी बाळगावी लागेल? ते जाणून घेऊया...

कर्क राशीत मंगळ विराजमान आहे. या राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक बाबींवर खूप सावध राहावे लागेल. बजेट लक्षात घेऊन काम करा. या काळात मोठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर काही काळ थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. काळजीपूर्वक काम करावे. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही वादातही अडकू शकता. वाद टाळण्यासाठी केलेल प्रयत्न यशकारक ठरतीलच असे नाही. खर्चही वाढू शकतो. आर्थिक स्थितीची विशेष काळजी घ्यावी लागेल.

धनु राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक परिस्थितीत बरेच चढ-उतार होऊ शकतात. जवळच्या व्यक्तीशी सावध राहण्याची गरज आहे. तुमची फसवणूक होऊ शकते. स्वतःच्या काही गोष्टी आर्थिक नुकसान करू शकतात. सावधगिरी बाळगून कामे करावीत.

कुंभ राशीत शनी विराजमान आहे. या राशीच्या व्यक्तींना षडाष्टक योग संमिश्र ठरू शकेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. काम पूर्ण लक्ष देऊन करावे. कामाच्या बाबतीत तणावाचा सामना करावा लागू शकतो. काही समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जून महिना महत्त्वाचा मानला जात आहे. सूर्य, बुध आणि मंगळ राशीपरिवर्तन करणार आहेत. तर शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.