२०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:04 PM2022-12-07T15:04:22+5:302022-12-07T15:11:15+5:30

२०२३ ला शनी राहु आणि मंगळाच्या नक्षत्रांमध्ये प्रवेश करणार असून, याचा काही राशींना उत्तम फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनी ग्रहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शनी हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला जातो. कर्मकारक आणि न्यायी ग्रह म्हणून शनीकडे पाहिले जाते. सन २०२३ च्या सुरुवातीलाच शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामित्व शनीकडे आहे. शनीच्या कुंभ प्रवेशाने साडेसाती चक्रात बदल होणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये धनु राशीची साडेसाती संपूष्टात येणार असून, मीन राशीची साडेसाती सुरू होणार आहे.

शनी पुढील नववर्षात तीन वेळा नक्षत्र बदल करणार आहे. शनी जेव्हाही नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात तेव्हा संबंधित रासच नव्हे तर त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. तसेच नक्षत्र बदलाचेही आहे. या नक्षत्र बदलाचाही काही राशींवर शुभ प्रभाव तर काही राशींवर संमिश्र परिणाम दिसून येऊ शकेल.

फेब्रुवारी २०२२ ला शनीने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला होता. सन २०२३ मध्ये शनी कुंभ राशीत स्थिरावणार आहे. २०२३ च्या मार्च महिन्यात शनी शततारका नक्षत्रात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. राहु हा क्रूर, मायावी आणि अनपेक्षित घटनांचा कारक मानला जातो. तर शनीला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते.

जेव्हा राहुच्या नक्षत्रात शनी प्रवेश करेल तेव्हा त्यांचा प्रभाव वृषभ, कर्क, तूळ व मकर राशीवर दिसून येणार आहे. या राशीच्या मंडळींना आपल्या धन व आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्वचेसंबंधित विकारांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच सावध होऊन खबरदारी बाळगणे हिताचे ठरेल.

मार्च महिन्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये शनी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. शनी व मंगळ हे एकमेकांच्या विरुद्ध ग्रह मानले जातात.

या कालावधीत मेष, वृश्चिक व सिंह राशीच्या मंडळींना काही कष्ट सहन करावे लागू शकतात. या काळात विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकते. जोडीदाराला दुखावणे आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते.

ऑक्टोबर नंतर महिन्याभरानेच लगेच २४ नोव्हेंबरला शनिचे तिसरे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. शनी पुन्हा एकदा धनिष्ठा नक्षत्रातून शततारका नक्षत्रात येणार आहे. याचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

शनीच्या पुन्हा शततारका नक्षत्रातील प्रवेशानंतर मकर, कुंभ, वृषभ, तूळ या राशींना कष्टातून मुक्तीचे योग आहेत. अनेकांना धनलाभ व प्रगतीची संधी सुद्धा मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.