Navratri 2022: नवरात्रोत्सव: ‘या’ वाहनावरुन होणार देवीचे आगमन; कसा असेल प्रभाव? पाहा, यंदाचे अद्भूत शुभ योग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:23 PM2022-09-21T14:23:46+5:302022-09-21T14:28:58+5:30

Navratri 2022: यंदाच्या वर्षी नवरात्रात अद्भूत योग जुळून येत असून, देवीचे वाहन देशासाठी शुभ संकेत देणारे ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण, भजन उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम मानला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी दोन नवरात्र गुप्त पद्धतीने केली जातात. मात्र, दोन मोठ्या प्रमाणावर साजरी केली जातात. (Navratri 2022 Devi Vahan)

त्यापैकी एक अत्याधिक महत्त्व असलेले नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र. यंदा २०२२ रोजी २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र साजरे केले जाणार आहे. यावर्षी शारदीय नवरात्र २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून, ०५ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने नवरात्रीची सांगता होईल. ०४ ऑक्टोबर रोजी नवमी पूजन केले जाणार आहे. यंदा अतिशय विशेष आणि शुभ मानल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये असा योगायोग घडला आहे, तो म्हणजे नवरात्र संपूर्ण ९ दिवस साजरे केले जाणार आहे. (Shardiya Navratri 2022 Devi Vahan)

नवरात्रात एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा नवरात्र ९ दिवस साजरे केले जाते, ते कल्याणकारी, शुभ ठरणारे असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या वर्षी दुर्गा देवी हत्ती वाहनावर आरुढ होऊन पृथ्वीवर येईल. याच वाहनावर आरुढ होऊन दुर्गा देवी परत जाईल, असे सांगितले जात आहे. दुर्गा देवीचे हत्ती वाहन अतिशय शुभ मानले जात असून, याचा अत्यंत सकारात्मक परिणाम देश-दुनियेवर पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. (Navratri 2022 Amazing Yoga)

यंदा सोमवारपासून नवरात्र सुरू होत असल्याने यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे. या संदर्भात देवी भागवत पुराणात सांगितले आहे की, नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार आणि सोमवारी होत असल्यास देवीचे वाहन हत्ती असते. गजारुढ देवीचे आगमन झाल्याने यंदा खूप चांगला पाऊस होऊन शेतीही चांगली होणार असल्याचे संकेत आहेत. देशात अन्नधान्य आणि वित्तीय साठा वाढू शकेल, असे सांगितले जात आहे. (Shardiya Navratri 2022 Amazing Yoga)

बुधवार ५ ऑक्टोबर २०२२ रोजी नवरात्रीची सांगता होत आहे. या दिवशी देवी पृथ्वीवरून आपल्या जगात परत जाते, म्हणून याला प्रवास तारीख असेही म्हणतात. त्यामुळे या दिवशी कुठेही प्रवास करण्यासाठी पंचांग आणि मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी तुम्ही कोणत्याही दिशेने प्रवास करू शकता, असे सांगितले जाते.

५ ऑक्टोबर रोजी दसरा आणि नवरात्री सांगता होतानाही देवीचे वाहन हत्तीच असणार आहे. देवी भागवत पुराणानुसार, अशा स्थितीत देवीचे आगमन आणि नवरात्र सांगता या दोन्ही गोष्टी चांगल्या पावसाचे संकेत देत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय यंदाच्या नवरात्रात अतिशय शुभ योगही जुळून येत असून, नऊही दिवस उत्तम योग असल्याचे सांगितले जात आहे.

या वेळी नवरात्रात अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला सकाळी सूर्योदयाच्या वेळी सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग होईल. यासोबतच अमृत सिद्धी योगही प्रभावी होणार आहे. या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की, या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस राहील. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगात देवीची पूजा अत्यंत शुभ मानली गेली असून, तुम्हाला सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही, असे सांगितले जाते.

३० सप्टेंबर आणि ०२ ऑक्टोबर रोजी म्हणजेच पंचमी आणि सप्तमी तिथी असेल. या दिवशीही सर्वार्थ सिद्धी योग राहील. २९ सप्टेंबरला म्हणजे चतुर्थी आणि १ आणि ३ ऑक्टोबरला म्हणजे षष्ठी आणि अष्टमीच्या दिवशी रवियोग होत आहे. रवि योगाचा संबंध सूर्याशी आणि हा शुभ योग मानला जातो.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी कार्याच्या संपन्नतेसाठी प्रार्थना करून घटस्थापना करण्याची प्राचीन परंपरा आणि पद्धत आहे. देशातील कोट्यवधी घरांमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत रुढ आहे. तर काही ठिकाणी मोठ्या मंडळांमध्येही दुर्गादेवीसह घटस्थापना केली जाते. घरातील सुख, शांतता समृद्ध होण्यासाठी नवरात्रातील संपूर्ण दिवस घटस्थापना करून दुर्गा देवीचे पूजन केले जाते.