शास्त्र सांगते की 'या' पाच गोष्टी हिंदूंनी पाळायला हव्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 08:00 AM2021-07-13T08:00:00+5:302021-07-13T08:00:09+5:30

हिंदू धर्म विशाल आहे, विस्तृत आहे आणि लवचिक सुद्धा आहे. धर्म म्हणजे धारणा, आचार, विचार यांची शिस्तबद्ध आखलेली चौकट. या चौकटीच्या अखत्यारीत अनेक गोष्टी येतात. परंतु, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे धर्माची काटेकोर बंधने नाहीत. तर त्यात नियमावली आहे. हर तऱ्हेच्या अडी अडचणीवर मात करण्यासाठी धर्मशास्त्रात पर्याय दिले आहेत. तरीदेखील काही गोष्टी आपल्या हितासाठी धर्मशास्त्राने बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. त्या कोणत्या, ते पाहू...

पूज्य गीताग्रंथ प्रत्येकाने घरात ठेवून वाचन करावे. भगवद्गीता ही खरे पाहता हिंदू धर्मियांपुरती मर्यादित नाही, तर ती समस्त मानव जातीला प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने ती आपल्या घरी बाळगावी आणि त्याचे वाचन, पठण आणि चिंतन करावे.

घरापुढे तुळशी वृंदावन असावे व नित्य श्रीहरी पूजन करावे. तुळशीचे रोप दारात लावण्याचे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे केवळ वातावरणशुद्धी होते असे नाही, तर भगवंताचे सान्निध्य कायमस्वरूपी लाभते.

इष्ट देवतेचे पूजन, धर्मग्रंथांचे अध्ययन करावे. पूजा हा केवळ उपचार नाही तर ती परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. म्हणून आपल्या सोयीने देवाचे पूजन न करता नित्य सवय लावून घेत मनोभावे पूजा केलीच पाहिजे.

घर, वाहन, पुस्तक यावर ओंकार लिहावा. आपल्या संस्कृतीने काही चिन्हे ही शुभ चिन्हे ठरवली आहेत. ओंकार हादेखील त्यापैकी एक आहे. म्हणून नवीन वस्तू, वास्तू, पुस्तक यांच्या शुभारंभी ओंकार अर्थात गणरायाच्या स्मरणाने सुरुवात करावी.

प्रार्थनास्थळे, मंदिर, आश्रम येथे जाण्याची सवय ठेवावी. मंदिरात जाणे हा संस्कार आहे. पूर्वी आजी आजोबा नातवांना घेऊन रोज मंदिरात जात असत. त्यामुळे बाल वयात मुलांना भजन कीर्तनाची गोडी लागत असे. आता व्यस्त दिनचर्येमुळे भाविकांचे मंदिरात जाणे कमी झाले आहे. परंतु, ही चांगली सवय लावून घेतली तर मुलांवर चांगला संस्कार घातला जातो व त्यांना योग्य वळण लावता येते.