Shravan 2024: श्रावणात 'या' तीन गोष्टी अजिबात खाऊ नका; १०० वर्षं जगाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:16 PM2024-07-30T13:16:59+5:302024-07-30T13:20:30+5:30

Shravan 2024: येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरु होत आहे. व्रत वैकल्यांनी युक्त असलेल्या या श्रावण मासात अर्ध्याहून अधिक दिवस तर उपासाचे असतात. उरलेल्या दिवसात सण-उत्सव असल्याने गोडा-धोडाचा स्वयंपाक असतो. त्यातही शास्त्राने आहाराच्याबाबतीत तीन पथ्य सांगितली आहेत, जिचे पालन केले असता आपण १०० वर्षं निरोगी आयुष्य जगू शकू असे म्हटले आहे. ती पथ्य कोणती ते जाणून घेऊ.

श्रावणात भरपूर पाऊस पडतो. या काळात भूक भरपूर लागत असली तरी पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे तळणीचे पदार्थ खुणावत असले तरी ते पचवणे शरीराला जड जाते. अशातच पावसाळी मंद-कुंद वातावरण पाहता शरीरभर चढलेला आळस पाहता व्यायामासाठी पोषक वातावरण नसते. झोप पूर्ण होत नाही. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, व्हायरल इन्फेक्शन यामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरु असतात. म्हणून या काळात आहाराशी निगडित पथ्य सांगितली आहेत.

पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळात पहिले पथ्य म्हणजे तामसी आहार घेऊ नये असे सांगितले जाते. यात कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, व्यायान या सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो. या सवयीचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून त्याला धार्मिक अधिष्ठान दिले आहे. धर्म कार्याची जोड दिली असता, लोक भक्तिभावाने नियमांचे पालन करतात आणि श्रावण 'पाळतात'.

दुसरा नियम म्हणजे, श्रावणात पालेभाज्या खाऊ नये. पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात. शिवाय निसर्गात हा काळ प्रजननाचा असल्यामुळे पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्म-अतिसूक्ष्म कीटकांचे साम्राज्य असते. जे सामान्य नजरेला दिसणारही नाही. या भाज्या कितीही धुवून स्वच्छ केल्या तरी त्यावरील जंतुसंसर्ग दूर होईलच असे नाही. म्हणून या काळात फळभाज्यांचा जास्त वापर करावा.

त्याचप्रमाणे श्रावणात कडधान्यांचाही वापर टाळावा. कडधान्य पौष्टिक असली तरी पचायला जड असतात आणि वातूळही असतात. म्हणून कडधान्यांचेही सेवन करू नये. मग तुम्ही म्हणाल, नेमके खायचे तरी काय?

तर उत्तर आहे, जास्तीत जास्त फलाहार, तोही मौसमी फळांचा आहार! या काळात फळांचे सेवन शरीराची सर्व आवश्यक पोषक तत्त्वांची गरज भागवते. शिवाय गहू, तांदूळ, ज्वारी, फळभाज्या, गोड पदार्थ, दही, दूध, तूप, ताक यांचाही आहारात समावेश केला असता जेवण रुचकर होते आणि अंगी लागते. पोट बिघडत नाही, तब्येत छान राहते.

ही पथ्य पाळली असता १०० वर्षं तुम्ही निरोगी जीवन जगाल असे शास्त्र सांगते आणि जे पाळणार नाहीत, त्यांना येत्या दहा वर्षांत शरीरावर होणारे परिणाम दिसू लागतील. या सर्व गोष्टींना शास्त्राधार आहे आणि आहार विज्ञानाचाही दुजोरा आहे. त्यामुळे ५ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या श्रावणाची आताच पूर्व तयारी करायला घ्या आणि छान निरोगी दीर्घायुषी व्हा!