श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:00 AM 2023-08-24T07:00:07+5:30 2023-08-24T07:00:07+5:30
श्रावणी गुरुवारी ऐंद्र नामक शुभ योग जुळून येत आहे. कोणत्या राशींवर स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि पुण्य फलदायी लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... निज श्रावण महिना सुरू आहे. दुसरा श्रावणी गुरुवार २४ ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस अतिशय विशेष मानला गेला आहे. या दिवशी बृहस्पति पूजनासह श्रावण शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी आहे. तसेच ज्या दुर्वांशिवाय गणपती पूजन अपूर्ण मानले जाते, त्या दुर्वांचे महत्त्व आणि महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमीचे व्रत आहे. श्रावण अष्टमीला हे व्रत केले जाते.
गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांना समर्पित असल्याचे मानले जाते. तसेच श्रावणी गुरुवारी ऐंद्र योग आणि विशाखा नक्षत्राचा प्रभाव राहील, असे सांगितले जात आहे. याशिवाय गुरुवारी दत्तगुरुंचे अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांची आराधना, उपासना, नामस्मरण केले जाते.
श्रावणी गुरुवारी वृश्चिक राशीत चंद्राचे भ्रमण असेल. तसेच ऐंद्र नावाचा शुभ योग तयार होत आहे, जो व्यक्तीला धनवान आणि पुण्यवान बनवतो, असे मानले जाते. गुरुवारी विशाखा नक्षत्राचा प्रभाव दिवसभर राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दुसरा श्रावणी गुरुवार काही राशींसाठी ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे लाभदायक असणार आहे.
या राशींना भगवान विष्णूचा आशीर्वाद लाभतील.ज्यामुळे आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे सांगितले जात आहे. यासह काही ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याने कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. कोणत्या राशींवर स्वामींची शुभ कृपा असू शकेल? कोणत्या राशींना शुभ योगाचे फलदायी लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी दुसरा श्रावणी गुरुवार शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. जोडीदारासोबत दिवस खूप रोमँटिक असू शकेल. नाते मजबूत होईल. पैशामुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. घरगुती समस्यांपासून सुटका मिळेल. परदेशात जाण्याची किंवा कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी मेहनतीचे कौतुक करतील. ऐंद्र योगाच्या शुभ प्रभावामुळे व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळू शकेल. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी गुरुवारी केशर, पिवळे चंदन, हळद दान करावे.
मिथुन राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी गुरुवार अतिशय फलदायी ठरू शकेल. पैसा मिळवण्यात यश मिळेल. व्यवसाय पुढे नेण्याच्या योजना यशस्वी होतील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. नोकरदार लोकांसाठी दिवस खूप शुभ आहे. दुसऱ्या कंपनीकडून चांगली नोकरी मिळू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. चांगली बातमी समजेल. शेजाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती मिळेल, जी भविष्यात उपयुक्त ठरू शकते.
सिंह राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी गुरुवार शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. मानसिक शांतता लाभेल. व्यापारी किंवा दुकानदारांना चांगला फायदा होऊ शकेल. कमाईची व्याप्ती वाढवेल. प्रवासातून लाभ मिळू शकतो. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. ध्येय पूर्ण करण्यात सक्षम होतील. व्यावसायिक प्रगतीसाठी गुरुवारी कामाच्या ठिकाणी पिवळा रंगाचा वापर करावा. लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करा.
मकर राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी गुरुवार लाभदायी ठरू शकेल. नोकरदारांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. परदेशात नोकरी आणि शिक्षणाच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना एखाद्या डीलमधून चांगला नफा मिळू शकेल. मित्र आणि प्रियजनांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना करू शकतात. सासरच्यांशी संबंध चांगले राहतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. मन धार्मिक कार्यात लागेल. जोडीदार आणि मुलांसोबत लक्झरी वस्तूंची खरेदी करू शकाल. सत्यनारायण कथा श्रवण करावी. गुरुवारी विशेष व्रत करा.
कुंभ राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी गुरुवार फायदेशीर ठरू शकेल. करिअरच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी होऊ शकेल. करिअरबाबत समाधान मिळू शकेल. विद्यार्थ्यांचा अभ्यास योग्य दिशेने होईल. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे कमवू शकतात. दिवस चांगला जाईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.