शुक्राचा मकर प्रवेश: मेष, तूळसह ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम काळ; नववर्षाची सुरुवात होईल दमदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:53 PM2022-12-14T13:53:02+5:302022-12-14T14:01:07+5:30

शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाची सुरुवात शुभ-फलदायी ठरू शकेल. जाणून घ्या...

नवग्रहांमधील शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करत आहे. २९ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीत विराजमान होईल. १७ जानेवारीपर्यंत शनी आणि शुक्र मकर राशीत युतीत विराजमान असतील.

मकर संक्रांतीला म्हणजेच १४ जानेवारी रोजी नवग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. तर, २२ जानेवारीपर्यंत शुक्र मकर राशीत असेल, त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेला आहे.

शुक्राचे मकर राशीत होत असलेले आगमन मेष, मकर, तूळ राशीसह अनेक राशींसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणारे आहे. शुक्र, सूर्य आणि शनी हे तीन ग्रह काही कालावधीसाठी मकर राशीत असणार आहेत. याचा मोठा प्रभाव राशींसह देश-दुनियेवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे.

शुक्राचे मकर राशीत होत असलेले आगमन काही राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाची शुभ लाभदायक ठरू शकते. नोकरी, व्यवसाय, करिअर, धन-संपत्तीमध्ये शुक्राचे गोचर फलदायी सिद्ध होऊ शकते, असे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या गोचराचा सकारात्मक परिणाम मिळू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने नववर्षाची सुरुवात लाभाची होऊ शकेल. पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. दिग्गज लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. भविष्यात त्याचा फायदा होईल. व्यवसायिकांसाठी हा काळ चांगला असेल. नोकरदारांना चांगली बातमी मिळू शकेल. आर्थिक बाबतीतही यश मिळेल. पैसा टिकू शकेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. शक्य असल्यास नियमितपणे शुक्र मंत्राचा जप करावा.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने नववर्षाची सुरुवात शुभ परिणामकारक ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात नफा मिळेल. धार्मिक बाबींमध्ये रुची वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. संचित संपत्तीतही वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये जवळीक वाढेल. शक्य असल्यास यथाशक्ती नियमितपणे लक्ष्मी देवीचे नामस्मरण करावे.

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने नववर्षाची सुरुवात सुखकारक ठरू शकेल. सुविधा वाढतील. सकारात्मक परिणाम करिअरवरही दिसून येतील. नोकरीच्या अनेक संधी मिळतील. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जीवनसाथीचा सर्व प्रकारे पाठिंबा मिळेल. व्यावसायिक काही नवीन करार करू शकतात. याचा भविष्यात चांगला नफा मिळू शकेल.

मकर राशीत होत असलेल्या शुक्राच्या आगमनामुळे या राशीच्या व्यक्तींची नववर्षाची सुरुवात सकारात्मक होऊ शकेल. नवीन वर्षात आर्थिक स्थिती खूप मजबूत होऊ शकेल. करिअरचा हा टप्पा तुमच्यासाठी प्रगतीशील असेल. करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकेल. सहलीला जाण्याचे नियोजन करू शकता. कुटुंब आणि जोडीदाराशी संबंध सुधारतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. शक्य असल्यास नियमितपणे लक्ष्मी देवीचे पूजन आणि नामस्मरण करावे.

मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने नववर्षाची सुरुवात शुभ फलदायी ठरू शकेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर भागीदारांशी तुमचे संबंध सुधारतील. अडकलेले पैसे मिळाल्यानंतर काही कामे पूर्ण होतील. शारीरिकदृष्ट्या स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यास सक्षम असाल. शक्य असल्यास दर गुरुवारी शिवमंदिरात पूजा करावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.