शुक्राचा सूर्य नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना उत्तम, अनेक संधी; पद-पैसा वाढ, शुभ-लाभांचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 07:12 AM2024-08-15T07:12:16+5:302024-08-15T07:21:03+5:30

काही दिवसांपूर्वी शुक्राने सूर्य राशीत प्रवेश केला होता. आता शुक्र सूर्याचे स्वामित्व असलेल्या नक्षत्रात गोचर करणार आहे. कुणाला मिळेल सर्वोत्तम लाभ? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आता सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वी शुक्राने सिंह राशीत प्रवेश केला होता. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. आता शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या राशीनंतर सूर्याच्या नक्षत्रात होत असलेले शुक्राचे गोचर महत्त्वाचे मानले जात आहे.

राशींप्रमाणे ग्रह नक्षत्रातही गोचर करत असतात. विविध नक्षत्र समूहांची मिळून रास तयार होत असते. त्यामुळे ग्रहांच्या नक्षत्र गोचराचा प्रभाव राशींवर पाहायला मिळतो. २२ ऑगस्ट रोजी शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २ सप्टेंबरपर्यंत शुक्र याच नक्षत्रात असेल, असे सांगितले जात आहे.

सूर्य हा पिता, आत्मा, आत्मविश्वास, शिक्षण, समृद्धी, सन्मान यांचा कारक मानला जातो, तर दुसरीकडे शुक्र आकर्षण, प्रेम, संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राचा सूर्याच्या राशीनंतर नक्षत्रात होत असलेला प्रवेश पाच राशींसाठी उत्तम काळ मानला जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: शुक्राचे नक्षत्र गोचर फायदेशीर सिद्ध होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीतही वाढ होऊ शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात बनवलेल्या प्लॅनद्वारे भरपूर पैसे कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. जोडीदारासोबत वेळ चांगला जाऊ शकेल.

कन्या: वैवाहिक जीवनात प्रेम राहू शकेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. नोकरदारांचे बॉसकडून कौतुक होऊ शकते. तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात विस्तार होईल. पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. एकाग्रता शक्ती वाढेल.

धनु: सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. पालकांचा ताण कमी होऊ शकेल. ज्येष्ठांना काही जुन्या आजाराच्या त्रासापासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ: करिअरच्या क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रमोशन आणि पगारवाढीसोबत बरेच फायदे मिळू शकतील. सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांशी चांगली स्पर्धा करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.

मीन: शुक्राचे गोचर फायदेशीर सिद्ध होऊ शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि चांगुलपणामुळे करिअरच्या क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रगतीसोबत बोनस मिळू शकतो. व्यवसायात फायदा होऊ शकेल. आर्थिक संकट संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.