Eclipse in 2022: सन २०२२ मध्ये ४ ग्रहणे लागणार; भारतात कोणते सूर्यग्रहण, चंद्रग्रहण दिसणार? जाणून घ्या, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:53 PM 2021-12-16T12:53:37+5:30 2021-12-16T12:57:59+5:30
Eclipse in 2022: पुढील वर्षी ग्रहणांची मालिका एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, नोव्हेंबरपर्यंत ४ ग्रहणे लागणार आहेत. सन २०२१ ची सांगता होण्यास अवघे काही दिवस राहिलेले आहेत. नवीन वर्षाचे संकल्प, नवी स्वप्ने, नवा आशावाद, विश्वास यांसह इंग्रजी २०२२ या नवीन वर्षाला प्रारंभ होईल. सन २०२२ हे वर्ष राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आगामी वर्षात लागणारे चंद्र आणि सूर्यग्रहण विशेष प्रभावशाली असतील, असे म्हटले जात आहे.
सन २०२२ मध्ये एकूण ४ ग्रहणे लागणार आहेत. यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण असतील. पुढील वर्षी ग्रहणांची मालिका एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, नोव्हेंबरपर्यंत ४ ग्रहणे लागतील.
या चार ग्रहणांपैकी भारतात किती ग्रहणे पाहिली जाऊ शकतात? दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण यांच्या तारखा, जगभरात कुठे पाहता येतील, याविषयी जाणून घेऊया...
सन २०२२ मधील पहिल सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी लागणार आहे. साधारणपणे दुपारी १२ वाजून १५ मिनिटांपासून ते ०४ वाजून ०७ मिनिटांपर्यंत या ग्रहणाचा कालावधी असेल. चैत्र अमावास्येच्या दिवशी लागणारे हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारातील असेल. हे ग्रहण मुख्यत्वे करून युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिका भागात दिसेल. भारतात याचा प्रभाव असणार नाही. त्यामुळे सूतक काल पाळू नये, असे सांगितले जात आहे. (solar eclipse 2022 date and time)
तर, सन २०२२ मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. अश्विन अमावास्येच्या दिवशी लागणारे हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारातील असेल. पंचांगानुसार, सायंकाळी ०४ वाजून ४९ मिनिटे ते ०६ वाजून ०७ मिनिटे हे सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे. म्हणजेच ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल. त्यामुळे भारतात ग्रहणमोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा, असे सांगितले जात आहे. (surya grahan 2022 date and time)
सन २०२२ मधील पहिले चंद्रग्रहण १६ मे रोजी लागणार आहे. वैशाख म्हणजेच बुद्धपौर्णिमेला सन २०२२ मधील पहिले चंद्रग्रहण लागेल. खग्रास प्रकारातील हे चंद्रग्रहण सकाळी ०७ वाजून ०२ मिनिटे ते १२ वाजून २० मिनिटे या कालावधीत लागेल. दक्षिणी/पश्चिमी युरोप, दक्षिणी/पश्चिमी आशिया, आफ्रिका, दक्षिणी आणि उत्तर अमेरिका, पॅसिफिक अटलांटिका, अंटार्टिका, हिंद महासागर या भागांमध्ये पाहता येईल. (chandra grahan 2022 date and time)
सन २०२२ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण ०८ नोव्हेंबर रोजी लागेल. कार्तिक पौर्णिमेला लागणारे हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे. म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. त्यामुळे भारतात कुठेही ग्रहण स्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशांत खग्रास अवस्था दिसू शकेल आणि अन्य प्रदेशांत हे चंद्रग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाचा स्पर्श दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटांनी तर, ग्रहणमोक्ष सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी होईल. (lunar eclipse 2021 date and time)
एकूणच ४ ग्रहणांपैकी साधारण दोन ग्रहणे भारतात दिसतील. तर, सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतातून दिसणार नाही. तर चंद्रग्रहणावेळी ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. त्यामुळे त्या त्या गावातील लोकांनी सूर्यास्त आणि चंद्रोदय या प्रमाणे पुण्यकाळ मानावा, असे सांगितले जात आहे.
सन २०२१ या वर्षातही ४ ग्रहणे झाली. विशेष म्हणजे २०२१ प्रमाणे पुढील वर्ष म्हणजेच २०२२ च्या कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. सलग दोन वर्षे कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण लागत असल्यामुळे हा विशेष योग मानला जात आहे.