सूर्य-शनी नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, बचतीवर भर द्या; प्रयत्न वाढवा, शुभ-लाभ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 07:07 AM2024-01-04T07:07:07+5:302024-01-04T07:07:07+5:30

पिता-पुत्र मानले गेलेले शत्रू ग्रह नक्षत्र परिवर्तन करत असून, याचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा न्यायाधीश शनी हे दोन ग्रह अधिक महत्त्वाचे मानले गेले आहेत. सूर्य आणि शनी हे दोन्ही ग्रह गोचर करतात, तेव्हा देश-दुनियेसह सर्व राशींवर त्याचा प्रभाव पडतो, असे सांगितले जाते. नववर्षाची सुरुवात झाली असून, राहु आणि केतु या ग्रहांच्या नक्षत्र गोचरानंतर आता सूर्य आणि शनी नक्षत्र गोचर करत आहेत.

काही पौराणिक कथांनुसार, सूर्य आणि शनी पिता-पुत्र मानले गेले आहेत. तर, ज्योतिषशास्त्रानुसार हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. काही दिवसांनी येणाऱ्या मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी म्हणजेच ११ जानेवारी रोजी सूर्य उत्तराषाढा नक्षत्रात तर शनी शततारका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात गोचर करणार आहेत.

सूर्य आणि शनी यांचे होणार नक्षत्र गोचर सर्व राशींवर प्रभावकारी मानले जात आहे. असे असले तरी ६ राशींवर नक्षत्र गोचराचा शुभ प्रभाव पडू शकतो. तर अन्य काही राशींना गोचराचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? मेष ते मीन या राशींवर सूर्य आणि शनी नक्षत्र गोचराचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...

मेष: एखादे गुपित उघडकीस येऊ शकते. कामात सावध राहण्याची गरज आहे. नावडत्या लोकांशी व्यवहार करावे लागू शकतील. तयारी ठेवा. नाते मजबूत ठेवण्यासाठी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती थोडी सुधारू शकते. भविष्यासाठी योजना आखू शकाल. बचतीवर भर द्यावा. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. योग आणि ध्यानधारणा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शांतता लाभण्यास मदत करेल. अध्यात्मिक बाजूशी जोडले गेल्याने जीवन आनंदी होईल. शक्य असेल तर योग्य मार्गदर्शनानंतर ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।, या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.

वृषभ: हा काळ अतिशय अनुकूल राहील. इतर लोकांशी असलेल्या संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. कोणत्याही समस्येवर जोडीदारासोबत मार्ग काढण्याची हीच योग्य वेळ आहे. जीवनात अधिक संघटित होण्याचा प्रयत्न करावा. यशस्वी होण्यासाठी इतर लोकांसह एकत्र काम करा. उद्योजकीय कौशल्ये वापरण्यासाठी काळ अनुकूल आहे. स्पर्धेत यश मिळवू शकता. नवीन व्यवसाय क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. आरोग्याचीही काळजी घ्यावी. नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. सहकाऱ्यांसोबत काम केल्यास कामात यश मिळू शकेल. नशिबाची साथही मिळेल. सामाजिक संबंधांमध्ये मनोबल आणि त्यागभावना आनंददायक ठरू शकेल. शक्य असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।, या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.

मिथुन: आरोग्य आणि कौटुंबिक समस्या कमी होऊ शकतील. व्यवसाय आणि नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. परंतु कठोर परिश्रम आणि संघर्षाने त्यावर मात करू शकता. नातेसंबंधांवर विशेष लक्ष द्यावे. जोडीदारासोबत वेळ घालवा. नाते मजबूत राहील. आर्थिक दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगावी. खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीवर भर द्यावा. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आत्मविश्वासामुळे येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यास मदत होऊ शकेल. ध्येयाकडे वाटचाल करा. प्राधान्यक्रम ठरवून काम करा. भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करा. एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. आत्मविकास आणि सामाजिक संबंध मजबूत करण्याचा काळ आहे. ॐ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्। , हा शनीचा गायत्री मंत्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर यथाशक्ती जपावा.

कर्क: या काळात मुलांवर, शिक्षणावर आणि प्रेमसंबंधांवर सकारात्मक प्रभाव पडेल. शिक्षणात आणि कार्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. योग्य गुंतवणूक करा आणि बचतीवर भर द्यावा. व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे पालन करा. कौटुंबिक बाबतीत तडजोड करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मेहनत आणि संघर्षाने ध्येय साध्य करू शकता. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नवीन संधी शोधा. ॐ सूर्याय नमः या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.

सिंह: जीवनातील विविध पैलूंवर प्रभाव दिसू शकेल. योगासने आणि ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक यशासाठी हुशारीने गुंतवणूक करा आणि बचतीवर भर द्यावा. कौटुंबिक बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्यावे. नातेसंबंध मजबूत होऊ शकतात, जोडीदारासोबत समजुतीने गोष्टी हाताळण्याची गरज आहे. करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी कामात समर्पित व्हा आणि नोकरीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधा. कोणाच्याही आधारावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या कौशल्यावर भर द्या. शिक्षणात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा. ध्येयासाठी कटिबद्ध राहा. सामाजिक नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी, सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय असणे आणि नवीन मित्र बनवणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम आणि संघर्षानेच ध्येय साध्य करू शकता. शक्य असल्यास आदित्यहृदय स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे.

कन्या: करिअरमध्ये यश मिळेल. कौशल्ये वापरा. नवीन संधींचा फायदा कसा घ्यायचा ते शिका. प्रार्थना आणि ध्यानात वेळ घालवा. आध्यात्मिक वाढीस मदत करेल. अर्थपूर्ण आणि उत्कृष्ट जीवनशैलीसाठी प्रयत्न सुरू ठेवा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी संवेदनशील तसेच सतर्क राहण्याची गरज आहे. लोकांशी अधिक सुसंवादी राहण्याचा प्रयत्न करा. नात्यात स्नेह आणि सहकार्य वाढवण्यावर लक्ष द्या. सर्व नियमांचे पालन करत आहात आणि पूर्ण मेहनत तसेच समर्पणाने काम करत आहात, याची खात्री करा. नात्यात काटेकोरपणा आणि समजूतदारपणा राखणे महत्त्वाचे आहे. जोडीदाराशी संवाद आणि सहकार्यावर विशेष लक्ष द्या. योग्य सल्ल्यानंतर, ॐ शं शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.

तूळ: आरोग्य आणि वैयक्तिक विकासात मदत होईल. आत्मविश्वास वाढेल. पैशाशी संबंधित परिस्थिती सुधारण्यावर भर द्यावा. आर्थिक लाभ होऊ शकतो, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेम जीवनात सुखद बदल होण्याची चिन्हे आहेत. नाते मजबूत होईल. प्रियकरासह अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा. भावनांचा आदर करा. सामाजिक जीवनात विचार मांडण्याची ही योग्य वेळ आहे. प्रवास आयुष्यात नवीन अनुभव आणि सर्जनशीलतेसाठी संधी देईल. शनी संबंधित गोष्टींचे यथाशक्ती दान करावे.

वृश्चिक: व्यावसायिक जीवनात यश मिळविण्याचे नियोजन करा. स्वावलंबन आणि संघटना यांकडे लक्ष द्या. आर्थिक परिस्थितीबाबत सावध राहा, खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना सावध राहा. कौटुंबिक बाबींमध्ये सहमती आणि समजूतदारपणा राखण्याचा प्रयत्न करा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि नवीन कौशल्ये शिका. सहलीचे नियोजन करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करा आणि काही ठिकाणांना भेट द्या. यशाच्या चाव्या हाती लागतील, फक्त आत्मविश्वासाने पुढे जा. कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेल. समृद्धी, शांततेचे वातावरण असेल. शनी देवाशी संबंधित गोष्टी कराव्यात.

धनु: आव्हानांवर हळूहळू मात करू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण पैशाचा गैरवापर करू नका. दैनंदिन व्यवहाराचा मागोवा ठेवा. बचत करण्याचा प्रयत्न करा. कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आरोग्यासाठी दैनंदिन दिनचर्येत शारीरिक व्यायामाचा समावेश करा. सावधगिरीने आणि योग्य मार्गदर्शनाने आव्हानात्मक वेळेवर मात करू शकता. करिअरमध्ये स्थिरता राखण्यासाठी काळजीपूर्वक काम करा. कामात यश मिळू शकेल. कौशल्ये सुधारतील आणि एकाग्र राहाल. शक्य असेल तर लाल आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेली वस्त्रे रविवारी दान करावीत.

मकर: सामाजिक परिस्थिती सुधारू शकते. सोशल नेटवर्किंगच्या कामाला वेळ द्या. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. करिअर सुधारण्यासाठी आणि नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या. व्यवसायात नवीन योजनांकडे वाटचाल करा. नियमित व्यायामामुळे आजारांपासून दूर राहण्याची क्षमता वाढेल. अभ्यासासाठी समर्पित व्हा जेणेकरून प्रयत्नांचे चांगले परिणाम होतील. क्रीडा क्षेत्रात चांगली क्षमता आहे. कौशल्ये वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. जीवनशैलीला नवी दिशा द्या. गुंतवणुकीसाठीही हा महिना चांगला असू शकतो, परंतु पैसे काळजीपूर्वक खर्च करा. आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बजेट तयार करा. त्यावर ठाम राहा. शक्य असेल तर तांब्याच्या कलशाने सूर्याला अर्घ्य द्यावे.

कुंभ: करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण प्रामाणिकपणे काम करा. वचनबद्धतेत कोणतीही कमीपणा येऊ देऊ नका. प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊ शकतात. करिअरमधील व्यस्ततेमुळे कुटुंब आणि आरोग्यासाठी वेळ देण्यात अडथळे येऊ शकतात. नातेसंबंध आणि आरोग्यावर परिणाम होईल. खर्चात वाढ होण्याची चिन्हे असल्याने आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. आर्थिक योजना लक्षात ठेवा. काळजीपूर्वक खर्च करा. अध्यात्मामुळे जीवनात सकारात्मकता येईल. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या. छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद घालणे टाळा. शक्य असल्यास रविवार व्रत आचरावे.

मीन: ज्ञान आणि अध्यात्माच्या क्षेत्रात आत्मविश्वास वाढवू शकाल. ध्येये पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध व्हाल. जीवनात यश, आनंद मिळू शकेल. यश मिळवण्यासाठी ज्ञान आणि शिक्षणाची आवड महत्त्वाची असेल. कौशल्ये सुधारण्यासाठी आणि नवीन योजनांचा अवलंब करण्याची ही योग्य वेळ आहे. कौटुंबिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. विशेषतः मुलांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या. ध्यानधारणा आणि योगाद्वारे मानसिक आरोग्य सुधारा. विचार आणि विश्वासांबद्दल सावधगिरी बाळगा. मानसिक शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. लव्ह लाइफ आनंदी आणि भरभराटीचे असेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.