सूर्याचे चंद्राच्या राशीत गोचर: ५ राशी ठरतील लकी, लाभच लाभ; वरदान काळ; नशिबाची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 11:15 AM2024-07-13T11:15:55+5:302024-07-13T11:24:39+5:30

सूर्याचे गोचर काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य दर महिन्याला राशीपरिवर्तन करत असतो. एका राशीत सूर्य सुमारे एक महिना विराजमान असतो. १६ जुलै रोजी सूर्य चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करत आहे. पुढील महिनाभर सूर्य कर्क राशीत असेल. सूर्याच्या हे राशी संक्रमण कर्क संक्रांती म्हणून ओळखले जाईल.

विशेष म्हणजे या राशीत बुध आणि शुक्र विराजमान आहेत. यामुळे त्रिग्रही योग, शुक्रादित्य आणि बुधादित्य असे शुभ योग जुळून येत आहेत. हे योग राजयोगाप्रमाणे फले देतात, असे म्हटले जाते. आगामी काळ काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जाते.

सूर्य, बुध आणि शुक्र हे एका राशीत अनेक शुभ योग निर्माण करत आहेत. हे तीनही ग्रह शुभकारक मानले जातात. या योगांमुळे काही राशींना आगामी काळ यश, प्रगती, उत्तमोत्तम संधींचा ठरू शकतो. नोकरी, करिअर, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर हे योग प्रभावी ठरू शकतात, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

वृषभ: नियोजित सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ, कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय वाढीची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन: प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना कामाशी संबंधित चांगल्या संधी मिळतील. कामात अधिक व्यस्त व्हाल. नोकरदारांवर कामाचा ताण जास्त असू शकतो. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते.

कर्क: आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. व्यक्तिमत्व सुधारू शकेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. पैसे कमविण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतील. पैसे वाचवू शकाल. भागीदारीच्या कामात चांगला लाभ मिळेल.

सिंह: नशिबाची साथ मिळू शकेल. प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी, विक्रीसाठी वेळ खूप चांगला असेल. चांगला करार करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरदारांना हा काळ शुभ आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. बहुप्रतिक्षित पदोन्नती किंवा इच्छित हस्तांतरण मिळू शकते. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतील. प्रिय जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल.

कन्या: आगामी काळ अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. जमीन आणि वाहने खरेदीकडे वाटचाल करू. गुंतवणूक करायची असेल तर चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

तूळ: आगामी काळ शुभ ठरू शकेल. कामात आणि व्यवसायात यश मिळेल. उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकेल. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. वडिलांसोबतचे नातेसंबंध सुधारतील.

धनु: करिअरशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतील. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना अपेक्षित संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीला मोठी उपलब्धी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक कामाची प्रशंसा करतील. कोणतेही काम करण्याची घाई करू नका.

मकर: विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. काही चांगली बातमी मिळू शकते. काही विशेष कामाशी संबंधित मोठा निर्णय घ्याल. कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरदारांचा काही गोंधळ उडू शकतो. करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.