तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:06 AM2024-10-17T10:06:05+5:302024-10-17T10:18:18+5:30

तूळ संक्रांती काळात नेमके कोणते उपाय करणे हिताचे ठरेल? मेष ते मीन या सर्व राशींवरील प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...

सूर्याचा नवग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य एका राशीत सुमारे एक महिना विराजमान असतो. सूर्याच्या राशी संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. १७ ऑक्टोबर २०२४ पासून सूर्य तूळ राशीत प्रवेश करत आहे. तर पुढील सुमारे महिनाभर सूर्य तूळ राशीत विराजमान असेल.

कन्या राशीतून सूर्य तूळ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे आगामी महिन्याभराचा काळ तूळ संक्रांती म्हणून संबोधला जाईल. काही दिवसांपूर्वीच बुध ग्रहही तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे.

सूर्य गोचर तूळ संक्रांतीचा प्रभाव कसा असेल? कोणत्या राशींना दिवाळी काळात शुभ लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? नेमके कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात? जाणून घेऊया...

मेष: सूर्याच्या तूळेतील भ्रमणाचा मिश्र परिणाम होत असल्याचे दिसू शकते. आपसातील मतभेद वाढू शकतात. अशावेळी आपणास वैवाहिक जोडीदाराशी शांत राहून संवाद साधावा लागेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. खर्च जास्त होईल. त्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक कार्ये घडतील. उपाय:-कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ्य द्यावे.

वृषभ: सूर्याचे राशी परिवर्तन अनुकूल आहे. ह्या गोचर प्रभावाने शत्रू कमी होतील. एखादी चांगली बातमी मिळेल. परदेशाशी संबंधित कामात फायदा होईल. कोणतीही मोठी समस्या होईल असे दिसत नाही. एखाद्या जुनाट आजारातून दिलासा मिळू शकतो. उपाय:-रोज गायत्री चालिसाचे पठण करावे.

मिथुन: सूर्याचे तूळेतील भ्रमण सामान्याहून चांगले फलदायी होणारे आहे. विद्यार्थ्यांसाठी हे भ्रमण अनुकूल आहे. उच्च शिक्षणात ते यशस्वी होतील. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. वाहन किंवा घरास सुशोभित करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करू शकता. मान-सन्मानात वाढ होईल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण लाभदायी होईल.

कर्क: सूर्याचे तूळेतील भ्रमण काहीसे त्रासदायी होऊ शकते. नोकरीत स्थानांतर संभवते. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तसे पाहू गेल्यास जीवन सामान्यच राहील. अधून-मधून अचानकपणे धनलाभ होऊन आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा देखील होऊ शकते. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण शुभ फलदायी होईल.

सिंह: सूर्याचे तूळेतील भ्रमण लाभदायी ठरू शकते. नशिबाची साथ मिळेल. सूर्य सिंहेचा राशी स्वामी आहे. अशा परिस्थितीत आत्मविश्वास उंचावेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. एखादा प्रवास करू शकता, परंतु ह्या दरम्यान सावध राहावे लागेल. धाडस व पराक्रम ह्यात वाढ होईल. कामगिरी उत्तम होईल. व्यापारात प्रगती होईल. उपाय:-एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा.

कन्या: सूर्याचे तूळेतील भ्रमण सामान्यच आहे. ह्या दरम्यान कुटुंबियांसह बाहेरगावी फिरावयास जाण्याचा कार्यक्रम आखू शकता. ह्या दरम्यान अनेक दिवसांपासून स्थगित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एकंदरीत सूर्याचे हे भ्रमण आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावे.

तूळ: सूर्य याच राशीतून भ्रमण करत आहे. अशा वेळी थोडे सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान अहंकारी होऊ शकता. व्यावसायिक भागीदाराशी आपले मतभेद वाढू शकतात. थोडे सावध राहिल्यास ह्या परिस्थितीतून बाहेर पडू शकता. ह्या दरम्यान क्रोधीत होऊन काम न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता लाभेल. उपाय:-गाईस गहू व गूळ खाऊ घालणे लाभदायी होईल.

वृश्चिक: सूर्याचे तूळेतील भ्रमण सामान्याहून चांगले फलदायी होणारे आहे. ह्या दरम्यान शत्रूंचा जोर कमी होईल. विरोधकांवर मात कराल. ह्या महिन्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण आपल्यासाठी हितावह होईल.

धनु: सूर्याचे हे राशी परिवर्तन अनुकूल असेल. ह्या दरम्यान आपले सामाजिक क्षेत्र वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. सध्या खर्च तर होतीलच, परंतु त्याच बरोबर प्राप्ती चांगली झाल्याने आर्थिक समतोल साधला जाईल. ह्या दरम्यान एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करण्याची योजना आखू शकता. उपाय:- शंकराचे पूजन लाभदायी होईल.

मकर: सूर्याचे तूळेतील भ्रमण सामान्यच राहील. नोकरीत उन्नती होईल, परंतु मोहापासून दूर राहावे. मोहित होऊन स्वतःचे एखादे नुकसान करून घेण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान कुटुंबियांना आरोग्य विषयक त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत काळजी घ्यावी लागेल. उपाय:-आई-वडिलांना नमस्कार करून दिवसाची सुरवात करावी.

कुंभ: सूर्याच्या तूळ राशीतील भ्रमणाचा प्रभाव होत असल्याचे दिसून येईल. हा महिना भाग्योदयाचा आहे. आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. ह्या दरम्यान एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. एखादा धार्मिक प्रवास करण्याची संधी मिळू शकते. एखादी गोष्ट साध्य होऊ शकते. अपूर्ण कामे सुद्धा पूर्ण होऊ शकतील. उपाय:-दर रविवारी उपवास करून गाईस गूळ खाऊ घालावा.

मीन: सूर्याचे तूळेतील भ्रमण काहीसे आव्हानात्मक असू शकते. अशा परिस्थितीत अत्यंत सावध राहावे लागेल. वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान कोणाशी वाद होऊ शकतो. अशा वेळी मौन धारण करून वाद टाळण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण हितावह होईल.